पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उमगत गेलं. ही प्रस्तावना म्हणजे कदाचित नमनाला घडाभर तेल असं वाटेल. रोगापेक्षा इलाज भयंकर असंही काहींना या भाष्याबद्दल वाटण्याची शक्यता आहे. पण कोणत्याही लेखक व लेखिकेची खरी यशस्विता असते ती, त्यांचं लेखन वाचण्यास किती वाचकांना प्रभावित करते यावर अवलंबून असते.

 प्रतिभा जगदाळे यांनी 'मिश्किली' सहज लिहावी अशी लिहिली आहे. त्यात शिळोप्याचा भागही दिसतो. पण त्यामागे एक अव्यक्त अस्वस्थपण आहे. सर्कशीतला विदुषक दुसन्यास हसवत, स्वतः आसवं जिरवत असतो असं म्हणतात. आपल्या आसपास आपणास हसवणारी माणसं, लाफ्टरशोमधील कलाकार, त्यांना दुःख नसतं असं थोडंच आहे? हास्यामागील खंत, खेदाची झिरझिरीत झालर तीच दुःखाचं खरं आरपार, पारदर्शी, नितळ दर्शन घडवते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्या पाश्र्वभूमीवर ‘मिश्किली' वाचलं की त्याचा महिमा समजण्यास वेळ लागणार नाही.

 पण त्यासाठी वाचकांकडे एक समजदार व प्रगल्भ मन हवं!

या लेखनाबद्दल लेखिकेचे मनःपूर्वक अभिनंदन! पुढील अधिक प्रगल्भ, प्रौढ व कलात्मक, लेखनासाठी शुभेच्छा!


◼◼

प्रशस्ती/१६३