पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/162

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिखावा, खोटं प्रदर्शन ठळकपणे मांडलं आहे.
 ‘अचाट स्मरणशक्ती' लेख वर्तमान अर्थ फुगवट्याचा फुगा, उच्च शिक्षितांच्या माध्यात्मानुरागी, बुवाबाजी व पारंपरिक वेडावर प्रहार करणारा लेख. जप, तप, बुवा, आराधना म्हणजे बुद्धी गहाण ठेवण्याचाच नाही तर, डोकं भाड्याने देण्याचा प्रकार कसा झाला आहे, याचं मार्मिक वर्णन करतो. जीवनात वखवख वाढली की विखार उद्भवतो नि विकारही. याचं चित्रण या लेखात केलं आहे. स्मरण असो वा विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या बौद्धिक संतुलन, असंतुलनाचे निदर्शक असतात, हे आपणास विसरून चालणार नाही.

 'नर' आणि 'वानर' यातलं अंतर एकविसाव्या शतकात संपून गेलं आहे. 'वानर' लेख वाचताना ते लक्षात येतं. श्रीमंतीच्या धुंदीने माणसांच्या डोळ्यांवर व डोक्यावर आत्ममग्नतेचं गारूड केलं आहे. वानराचा ‘नर' झाला खरा पण ‘वानर' अवस्थेतलं त्याचं रानटीपण काही हटलं नाही. अकारण गॉगल घालून डोळे चुकवू पाहणारा मनुष्य याचं अनुकरण माकडासही करण्याचा मोह होतो व मग तो माणसाचा गॉगलच पळवतो. हा माणसाचा पराभव जीवघेणा ठरतो. ‘हाक्के मावशी' हा ‘मिश्किली'मधील व्यक्तिगत लेख असला तरी त्याचं रूप व्यक्तिचित्राचं झालं आहे. 'मान न मान, मैं तेरा मेहमान मानणारी माणसं समाजात सर्वत्र आढळतात. ही त्यांची उपजत गरज असली तरी, समाजमान्य शिष्टाचाराच्या पाश्र्वभूमीवर अशी माणसं सांस्कृतिक कार्यक्रम, सण, समारंभात विदुषकी ठरतात. हे मात्र खरं.

 ‘हाक्के मावशी' हाक न मारता येते. ती समाजहितदक्षतेने नाही तर लांगूलचालन, लाळघोटेपणा, स्वार्थ यामुळे. असं वागणं निषाधार्हच. कथाकार व पु. काळेची एक कथा आहे, ‘कधीही बोलवा येतो. त्यातील नायक बोलवल्याक्षणी मदतीला दत्त, पण मदत व गरज संपताच अंतर्धान होणारं. नाव नाही, गाव नाही. ‘सार्वजनिक काका' असणारी माणसं असतात म्हणून हाक्के मावशी'ची हाकाटी, किळसवाणी वाटत राहाते.

 ‘पुरण पोळीचं पुराण' हे गृहस्थ जीवनातलं अटळ नाट्य. नातेसंबंधात देणं-घेणं ठरलेलं. त्यातलं प्रेम महत्त्वाचं. जिव्हाळा महत्त्वाचा खरा, पण नातेसंबंध म्हणजे कधी कुरघोडी असते तर कधी लपंडाव. तो लंगडीचा खेळही असतो व संगीत खुर्चीही असते. प्रतिभा जगदाळे यांनी 'मिश्किली मध्ये ‘पुरण पोळीचं पुराण' आणून तो सारा जीवनरस, राग व वैविध्य चित्रित केलं आहे.

प्रशस्ती/१६१