पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

मिश्किली (विनोदी लेखसंग्रह)
सौ. प्रतिभा जगदाळे
प्रयत्न प्रकाशन, औदुंबर
प्रकाशन - डिसेंबर, २०१४
पृष्ठे-८१ किंमत - १७५/
_________________________________________

हास्यामागील खंत जागवणारी 'मिश्किली


 ‘भावनांच्या हिंदोळ्यावर' हा स्फुट लेखसंग्रह आणि ‘अनुबंध' हा ललित लेखसंग्रह लिहिलेल्या सौ. प्रतिभा जगदाळे यांचा तिसरा लेखसंग्रह विनोदी आहे. ‘मिश्किली' या थेट शीर्षकातून ते स्पष्ट होतं. सौ. प्रतिभा जगदाळे यांच्या फक्त नावातच प्रतिभा आहे असे नाही, तर ती लेखणीतही आहे. त्यामुळेच त्या प्रत्येक वेळी नवीन लेखन शैली वापरतात. प्रथम स्फुट, नंतर ललित आणि आता विनोदाचा उपयोग त्यांनी केला आहे. त्यातून त्यांची त्रिविध प्रतिभा प्रत्ययास येते. 'विनोद' ही लेखनात शैली असली, तरी जीवनात मात्र वृत्ती असते. जी माणसं विनोद करू शकतात नि लिहू शकतात त्यांची जीवन प्रकृती निखळ असते. जीवनात निखळपण येतं ते स्वास्थ्यातून. पण कधी-कधी दुःख, वैराग्य, विशाद इत्यादी भावही 'विनोद' जन्मास घालत असतात. विनोद, व्यंग, हास्य अशा विनोदाच्या अनेक छटा आहेत. ‘हास्य विनोद' हा स्वास्थ्यकारक तर 'व्यंग विनोद गंभीर! टोमणा, टिचकी, फिरकी, वस्त्रहरण, प्रहार, टीका, उपहास, आक्षेप अशा कितीतरी पद्धतींनी हास्य, व्यंग व विनोद फेर धरत जीवन कधी हलकं, तर कधी अंतर्यामी बनवत असतो. प्रतिभा जगदाळे यांचं ‘मिश्किली हे दैनंदिन जीवनात घडलेल्या विनोदी घटनांचे चित्रण आहे. त्यात हास्य आहे, व्यंग आहे आणि उपरोधही भरलेला आहे.

प्रशस्ती/१५९