पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



अंधश्रद्धा मुक्त करून विज्ञाननिष्ठ बनवण्याचे दायित्व आहे, याचं भान यायला हवं. साहित्य समाजाचा दीपस्तंभ मार्गदर्शक बनायचा तर प्रतिभा ही प्रागतिक नको का व्हायला?

 ‘कावळ्याचा मान ही त्याच्या एकाक्ष (काना) होण्याची आख्यायिका आहे. कावळा एकाच डोळ्याने का पाहू शकतो या समजुतीवर आधारित आहे. ती समजच मुळात तपासून घेण्याची गरज नाही का? कावळा पूर्वजांचं प्रतीक मग चिमणी का नाही? या पाश्र्वभूमीवर ‘अज्ञानाचं इपरीत' कथेतील नायिका हौसाका अज्ञान दूर सारून डॉक्टरांकडे जाते. पुढे मुलांना शिकवण्याचा निर्धार करते, हे दाखवून लेखक पुरोगामी होत असल्याच्या पाऊलखुणा या संग्रहात आपण जसे वाचत पुढे जाऊ तशा आढळतात. त्या पाऊलखुणा भविष्यात राजमार्ग होईल तर तो लेखकाचा विकास आलेख ठरेल. तो ठरावा अशी अपेक्षा आहे. ‘गरिबीची जाणीव' मधील शिरीष याच विचाराची री ओढताना आश्वासक दिलासा देतो.

  ‘पश्चात्ताप', 'पेरणी', ‘सावीचं भूत', 'खेळ नियतीचा', 'कर्ज', 'डाव', ‘परिवर्तन'सारख्या अन्य कथांतून लेखक आश्वासक विकास दाखवत । असल्याने वाचकांना सुखद शिडकाव्याचा अनुभव येईल. विशेषतः ‘सावीचं भूत' कथेत भूत-पिशाच कल्पनेचा पर्दाफाश हा दिलासा ठळक करतो.

 समग्रतः ‘कष्टाचं चीज' कथासंग्रह रंगराव बन्ने यांचा विषय आणि विचारांच्या अंगाने विकास दर्शवणारा असला तरी तो कलाविकासाचे आव्हान देत राहतो. कथाकार रंगराव बन्ने यांचा प्रयत्न प्रामाणिक आहे. त्यांना शुभेच्छा!

◼◼

दि. १५ ऑक्टोबर, २०१४

प्रशस्ती/१५८