प्रबोधन पर्व प्रबोधनपर्व (लेखसंग्रह) प्रा. कुसुम कुलकर्णी सिंहवाणी प्रकाशन, कोल्हापूर प्रकाशन एप्रिल, १९९९ पृष्ठे १८४ किंमत रु.१००/-
पूर्व प्रबोधन
चौदाव्या शतकापासून ते सतराव्या शतकांपर्यंतचा सुमारे तीनशे वर्षांचा कालखंड हा युरोपच्या इतिहासात 'प्रबोधन पर्व' म्हणून ओळखला जातो. या कालखंडात पारंपरिक ग्रीक, रोमन संस्कृतीच्या मध्ययुगीन पारंपरिकतेच्या विरोधात कला, साहित्य, जीवन व्यवहाराच्या संदर्भात नवीन विचार मांडले गेले. या नवविचारांचा प्रारंभ इटलीत झाला. नंतर त्यांचा प्रसार युरोपात नि मग जगभर झाला. 'सर्व विश्वाच्या अस्तित्वाचा मानदंड मनुष्य 'होय' या ग्रीक तत्त्वज्ञ प्रोटॅगोरसच्या 'मानवतावादी सिद्धांता'चा वैचारिक 'विकास म्हणजे 'प्रबोधन पर्व'. या नवमतवादी विचाराने जगास भौतिकाकडून अवकाशाकडे नेले. या कालखंडाने मानवी सर्जन व विचारशक्तीचा विधायक विकास घडवून आणला. यातून जगभर बुद्धी, प्रतिभा व मानवी आचरणास एक नवे परिमाण लाभले, नवी दिशा मिळाली. यातून मानवी जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. जाती, धर्मनिरपेक्ष एकात्म मानवी समाजरचनेच्या वर्तमान जीवनातील आग्रहाच्या मागे प्रबोधन पर्वातील विचार - विकासाचे मोठे योगदान आहे.
महाराष्ट्रात 'प्रबोधन पर्व' उदयास आले ते एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास. 'दर्पण', 'ज्ञानोदय', 'विविध ज्ञानविस्तार', 'निबंधमाला'सारख्या नियतकालिकांतून प्रकाशित होणाऱ्या लेखांद्वारे धार्मिक व सामाजिक