पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


कष्टाचं चीज (कथासंग्रह)
रंगराव बन्ने
साहित्य विकास मंडळ, कारदगा
प्रकाशन - नोव्हेंबर, २०१४
पृष्ठे - ५६ किंमत - ७५/
_____________________________________

विकासाच्या पाऊलखुणांचा राजमार्ग व्हावा


 कथाकार रंगराव बन्ने यांचा 'कष्टाचं चीज' हा दुसरा कथासंग्रह आहे. यापूर्वी सन २०१२ मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह ‘रक्ताच्या नात्यापेक्षा प्रसिद्ध झाला होता. त्यासही मी प्रस्तावना लिहिली होती, असे आठवते. त्यात अकरा कथा होत्या. पैकी काहींना दैनिकातून प्रसिद्धी मिळाली होती. ‘कष्टाचं चीज' मध्ये एकूण पंधरा कथा आहेत. त्यातील कथांना पूर्वप्रसिद्धी मिळाली होती का ते कळण्यास काही वाव नाही. ही प्रस्तावना लिहिताना लेखकाने कथांची चवड तेवढी माझ्या हाती सोपवली आहे.
 रंगराव बन्ने कारदगासारख्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात रहात असले तरी प्रभाव म्हणाल तर मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीचाच दिसून येतो. ते ग्रामीण भागात राहात असल्याने त्यांच्या सर्व कथा ग्रामीणच असतात नि आहेत. ते स्वाभाविकच म्हणायला हवे. रक्ताच्या नात्यापेक्षा कथासंग्रहातील कथांच्या पार्श्वभूमीवर ‘कष्टाचं चीज' मधील कथा कलेच्या अंगाने उजव्या असाव्यात अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली असे वाचनांती माझे मत म्हणून नोंदवावेसे वाटते. ग्रामीण भागातील सर्वसाधारण माणूस कष्टांवर पोसतो. लेखनाचा छंदही कष्टसाध्यच असतो. लेखकास इतरांचे भरपूर वाचले पाहिजे. सतत चिंतन हवे. प्रयोग वृत्ती हवी. ती नसेल तर लेखन शिळोप्याचा उद्योग होतो. प्रख्यात कवी वसंत आबाजी डहाके

प्रशस्ती/१५६