पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाथा (कादंबरी)
चार्ल्स डिकन्स
भाषांतर- सुभाष विभूते चैतन्य सृजन व सेवा संस्था,आजरा
प्रकाशन -डिसेंबर, २०१२
पृष्ठे - ६६ किंमत - १0/



‘नाथा' जन्माला न येण्याचे शिवधनुष्य पेलूया!


‘नाथा' ही प्रा. सुभाष विभूते यांनी चार्लस् डिकन्सच्या ‘ऑलिव्हर विस्ट' या जगप्रसिद्ध इंग्रजी कादंबरीचं केलेलं मराठी रूपांतर आहे. या रूपांतराची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. स्वतः अनुवादकारांनी आपण केलेल्या या कार्याला ‘अनुनिर्मिती' असं म्हटलं आहे. असं म्हणण्याची कारणं आहेत. ते त्यांच्या दृष्टीनं अनुवाद नाही की रूपांतर. एक तर ते संक्षेपीकरण आहे. मूळ इंग्रजी ‘ऑलिव्हर विस्ट' ही कादंबरी पावणे दोनशे पानांची आहे. ती अवघ्या ४४ पानात प्रा. विभूते यांनी सादर केलेली आहे. दुसरं असं की या कादंबरीतील ब्रिटिश व्यक्तिरेखा, गावं, प्रसंग बदलून ती चक्क मराठी, महाराष्ट्रीय केलेली आहेत. यामुळे ती सादरकर्यास अनुनिर्मिती वाटते. तिचा एकोणिसाव्या शतकाचा काळ ही वर्तमान विसावे शतक करण्यात आला आहे.

 चार्लस डिकन्सची ‘ऑलिव्हर विस्ट' ही कादंबरी पहिल्यांदा 'बेंटलिज मिसिलिनी' या मासिकातून क्रमशः फेब्रुवारी १८३७ ते एप्रिल, १८३९ या काळात ५३ भागात प्रकाशित झाली तेव्हा तिचे नाव 'पेरिश बॉयज प्रोग्रेस' असे होते. त्याचा अर्थ होतो एक मृतप्राय बालकाची प्रगती. ही डिकन्सची दुसरी कादंबरी. यातून चार्ल्स डिकन्सनी गरिबांचा कायदा (Poor Law), बालमजूर, रस्त्यावरची मुले, बाल गुन्हेगार अशा विविध

प्रशस्ती/१२४