पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अंगांनी अनाथ निराधार मुलांचे संगोपन, शिक्षण, सुसंस्कार व पुनर्वसन विषयक प्रश्न मांडले. त्यामुळे ब्रिटिश समाजात या प्रश्नांविषयी जागृती निर्माण होऊन एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात पुअर होम्स, रिफॉर्मेटरी स्कूल्स, बोट्रल स्कूल, ऑर्फनेजीस, शेल्टर होम्स, फंडलिंग होम्स सुरू झाली. त्याच धर्तीवर विसाव्या शतकात भारतात अशा प्रकारच्या संस्था स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाल्या.

 विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगास दोन महायुद्धांना सामोरे जावे लागले. त्यात अक्षरशः लक्षावधी बालके मेली, जी जिवंत होती त्यापैकी अनेक आई-वडिलांच्या मृत्यूने अनाथ निराधार झाली होती. या मुलांच्या व विधवा स्त्रियांच्या प्रश्नातून युनो, युनिसेफ, युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय संघटना, संस्था उदयाला येऊन त्यांनी बालकांचे हक्क मान्य करून जागतिक स्तरावर अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, बालमजूर, संकटग्रस्त, युद्धग्रस्त बालकांच्या संगोपन व पुनर्वसनाचे कार्य अंगिकारले. पण त्या सर्वांमागे ‘ऑलिव्हर विस्ट' युरोपात घडवून आणलेला भावजागर होता हे आपणास विसरून चालणार नाही.

 ‘नाथा' हा प्रा. सुभाष विभूते यांनी घडविलेला ‘ऑलिव्हर विस्ट' चा एकविसाव्या शतकातला भारतीय अवतार होय. या अनुनिर्मितीत लेखकाने मूळ आशय सुरक्षित ठेवून चरित्र व प्रसंगांचे संक्षिप्तीकरण केले आहे. ही अनुनिर्मिती त्यांनी कुमार-किशोर गटातील बालवाचक डोळ्यांसमोर ठेवून केलेली असल्याने भाषा, घटना, चरित्र यांचे यात सुलभीकरण आहे. हे पुस्तक वाचून मुलांच्या मनात अनाथांविषयी सहानुभूतीच निर्माण होणार नाही तर ते त्यांच्या संगोपन, शिक्षणात आपला खारीचा वाटा उचलतील. खाऊचे पैसे बचत करणे, वाढदिवसावर पैसे कमी खर्च करणे, फटाके कमी उडविणे, या सर्वातून ते अनाथ मुलांशी नाते जोडतील व समाजातील सर्व अनाथ मुलांचे 'नाथ' होतील. या कादंबरीतील ‘नाथा' शेवटी त्याची परवड संपून सुखी घरात सुरक्षित होतो तसा प्रत्येक अनाथ मुलगा सनाथ व्हावा म्हणून प्रा. सुभाष विभूते यांनी केलेला खटाटोप. तो सुफळ संपूर्ण करणे तुमच्या संवेदनशील क्रियात्मकतेवर अवलंबून आहे.

 सगळ्याच बिया काही खडकावर पडत नसतात. या पुस्तकातला नाथा ज्यांच्या हृदयास भिडेल, भावेल तोच संवेदनशील वाचक, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे उलटली तरी आपल्या देशात मुलांचं अनाथ होणं कमी होत नाही. सन २०११ च्या जनगणनेनुसार या देशात आई-वडील नसलेली तीन कोटी मुलं आहेत. शिवाय बेघर, रस्त्यावरची,

प्रशस्ती/१२५