पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संग्रहाचे शीर्षक असलेली कथा ‘माणसापरास मेंढरं बरी न्यायाने भूतदयेचे, प्राणीप्रेमाचे उदाहरण होय. ‘उपकाराची परतफेड’, ‘माया', ग्रहणकथा अशाच पठडीतील. या सर्व कथांना बोधकथेचं वलय आहे. त्या केवळ वेळ काढायचं साधन, मनोरंजन, शिळोप्याचा उद्योग म्हणून लिहिलेल्या नाहीत. तर या लेखनामागे एक समाजभान आहे. रंजनातून दृष्टी, विचार, संस्कार देण्याची कथालेखकाची धडपड अनुकरणीय आहे.

 कथा हा साहित्यप्रकार म्हणून रामायण, महाभारत, उपनिषद, वेद, जातक साच्यातून आढळतो. कथा सांगणं नि ऐकणं ही माणसाची उपजत वृत्ती आहे. अगदी रानटी अवस्थेतही मनुष्य जंगलात शेकोटी पेटवून रात्रभर दिवसाच्या अनुभव कथा सांगत राहायचा. कथांचे सर्व प्रकार पूर्वीपासून आपल्यात आहेत. निसर्ग कथा, रूपककथा, दृष्टान्त कथा, बोधकथा, शिकार कथा, रहस्य कथा, प्रेमकथा, युद्धकथा किती प्रकार आहेत कथांचे. थोडक्यात, मोठा आशय सांगण्याचं कसब केवळ कथेतच असतं. रूपककथा या संदर्भात सगळ्यात सुंदर प्रकार. चांगल्या कथाकाराला भूत, वर्तमान व भविष्याचा मेळ घालता आला पाहिजे. खरा कथाकार भविष्यलक्ष्यी असतो. ‘सावध ऐका पुढल्या हाका' या ओळीतील गर्भितार्थ ज्याला गवसतो तो चांगला कथाकार होऊ शकतो. लहान मुलांना कार्टून्स का आवडतात तर ती उद्याच्या जगात त्यांना नेत असतात. कथाकाराला उद्याचं जग आज पाहता येण्याची प्रतिभा हवी. आजचं सगळ्यांनाच दिसतं. उद्याचा संसार दिसायला तुमचा व्यासंग हवा. रंगराव बन्ने हे सारं समजून घेऊन लिहितील तर त्यांची कथा जी आज केवळ वाचनीय आहे, उद्या ती विचारणीय होईल तर त्यांच्या लेखणीत सामर्थ्य आल्याचा प्रत्यय येईल. तो यावा अशी शुभेच्छा!

▄ ▄


दि. १० ऑक्टोबर, २०१२

कोल्हापूर

प्रशस्ती/१२३