पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रेम, विवाह, शेती-भाती, भाषा, रिवाज यांची लेखक म्हणून असलेली समज प्रौढ आहे. त्यामुळे परिसरात घडलेल्या घटनांचे पडसाद म्हणून त्यांची कथा आकार घेत राहते. ते कल्पनेनं कथा लिहीत नाहीत. त्याची कथा वास्तवावर बेतलेला कल्पनेचा इमला असतो. कुठल्या कथेत कशी पात्रं निर्माण करायची, कुठल्या कथेची भाषा कशी हवी यांचे लेखक म्हणून रंगराव बन्नेचे स्वतःचे असे आडाखे असतात. त्यातून त्यांची कथा खुलत राहते. ती वाचनीय असते. प्रत्येक कथेचं बीज वेगळं. घटना, प्रसंग, पात्र, प्रदेश, वातावरण वेगळे. म्हणून प्रत्येक कथेचा चेहरा-मोहरा वेगळा. त्याचं वाचन वाढलं, इतर कथाकारांच्या कथालेखनाचा त्यांनी अभ्यास केला, स्वतःचं चिंतन, विचार विकसित केले तर या कथा संग्रहापेक्षा अधिक सरस नि सकस कथा ते मराठी साहित्य व वाचकास देतील असा विश्वास ‘रक्ताच्या नात्यापेक्षा' मधील कथा वाचताना वाटला.

 या कथासंग्रहातील ‘तपास' कथा नव-याला सोडून श्रीपती जाधवबरोबर राहणाच्या धोंडीच्या खुनाच्या तपासाची कथा. सडलेलं प्रेत हाती आल्यानं खून की आत्महत्या ठरवू न शकलेल्या पोलिसांच्या पुढे तपासाचं आव्हान उभं असतं. इन्स्पेक्टर नांगरे शक्कल लढवतात. त्यांना हे माहीत असतं की बाईच्या खुनाचं रहस्य बाईलाच माहीत असणार. ते पांदीत हागणदारीच्या निमित्तानं येणाच्या बायकांवर पहारा बसवतात. गप्पा ऐकतात नि खुनाचे धागेदोरे मिळवतात. हे सारं कथाकार मोठ्या रहस्यानं सांगतो ते मुळातूनच वाचायला हवं. ओवाळणी' ही बंधुप्रेमाची कथा. बहीण नसल्याचं शल्य एक तरुण संकटग्रस्त भगिनीची अब्रू वाचवून दूर तर करतोच पण ओवाळणी म्हणून तिला प्रत्येक संकटग्रस्त स्त्रीस मदत करायचं आश्वासन देतो. यातून लेखकाचं आदर्श, मूल्य इ. बद्दलचं प्रेम व्यक्त होतं. मराठी कथेत तर वि. स. खांडेकरांनी 'भाऊबीज' विषयावर आठ-दहा कथा लिहिल्यात. त्या बन्ने वाचतील तर ‘ओवाळणी' कथा त्यांना अधिक प्रभावीपणे लिहिता येईल. 'साथ', 'त्याग', ‘शेवटचा आशीर्वाद' या तीनही कथा प्रेमकथा होत. त्याही वेगळी पात्रं, प्रसंग निवडून त्या कथा वाचनीय बनवल्याआहेत. पैकी 'त्याग' मधला नायक प्रेमी शिक्षक असतो. पण तो स्वतःचं प्रेम व्यक्त न करता अविवाहित राहून जपतो. यात प्रेम आणि शिक्षक दोन्हीचं मूल्य व महत्त्व जपलं गेलं आहे. या संग्रहातील ‘आधार’ कथा ग्रामीण होय. ती भाषेच्या अंगाने जशी ग्रामीण तशी पात्रं, घटना इ. नी पण. ‘भक्तीचे मोल' कथेतून भिका-याचं दातृत्व व कृतज्ञता स्पष्ट होते.‘शेवटचा आशीर्वाद'काल्पनिक कथा वाटते.'रक्ताच्या नात्यापेक्षा' ही या

प्रशस्ती/१२२