पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/122

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रक्ताच्या नात्यापेक्षा (कथासंग्रह)
रंगराव बन्ने साहित्य विकास मंडळ, कारदगा (कर्नाटक)
प्रकाशन - नोव्हेंबर, २०१२
पृष्ठे - ६८, किंमत - ७५/



उद्याचे जग आज पाहता यायला हवं

 रंगराव बन्ने यांचा ‘रक्ताच्या नात्यापेक्षा' हा कथासंग्रह मी वाचला. या संग्रहात एकूण अकरा कथा आहेत. पैकी पाच कथांना यापूर्वी दैनिक महासत्ता, इचलकरंजीतून पूर्वप्रसिद्धी मिळालेली आहे. त्या अर्थाने ते वाचक परिचित आहेत. नवोदित कथाकार असल्याने या त्यांच्या कथा रियाजाच्या काळातील होत. गायक छंद म्हणून प्रथम गातो. मग रियाज करतो. रियाजातून त्याला सूर गवसतो म्हणे. कथाकारांचं तसंच असतं. पहिल्यांदा तो छंद म्हणून लिहितो. मग त्याला लिहिण्याचा नाद लागतो. या नादातून मग त्याला त्याच्या प्रतिभेचं भान येतं. रक्ताच्या नात्यापेक्षा मधील कथा या असा सराव काळातील असल्यानं त्यांच्याकडून फार मोठ्या कलात्मक कथांची अपेक्षा करणं चुकीचं. या कथा वाचताना एक गोष्ट लक्षात येते की हा लेखक सजग आहे. त्याला आजूबाजूचं जग माहीत आहे. जगण्याचे प्रश्न माहीत आहेत. गरिबांची नाडवणूक, श्रीमंतांची माजोरी, तरुणांचं प्रेम, माणूस आणि जनावर यांच्यातील संबंध, फरक सारं त्याला चांगलं माहीत आहे. माणसांची या लेखकाला पारख आहे. पोलीस, शिक्षक, जमीनदार इ. व्यवसाय म्हणून तेथील माणसांचे चेहरे रंगराव बन्ने जाणून आहेत. ते ज्या ग्रामीण भागात राहतात तेथील नातेसंबंध, अर्थव्यवहार,

प्रशस्ती/१२१