पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या शल्यातून हे सारं लेखन झालं आहे. अतुल देसाई यांनी परिवीक्षा अधिकारी, वसतिगृह अधीक्षक, समुपदेशक म्हणून कार्य केलं आहे. त्या काळात वंचित बालकांशी त्यांचा जवळून संबंध आला. त्यातून बालपणाचं भीषण चित्र त्यांच्या लक्षात आलं. कोणतंही कल्याण वा विकास कार्य केवळ यंत्रणा नि संस्था उभारून होत नसतं. केवळ कायदेही उपयोगी ठरत नाहीत. त्यासाठी गरज असते त्या विषयासंबंधीच्या भावसाक्षरतेची व संवेदनशीलतेची. ती नसेल तर कार्यात कोरडेपण येतं. पूर्वी आपल्याकडे मुलांचे कायदे प्रत्येक राज्यात वेगळे होते. १९८६ साली प्रथम बालकल्याणाचा केंद्रीय वा राष्ट्रीय कायदा झाला. तो अपुरा नि सदोष असल्यानं त्यात सन २000 मध्ये दुरुस्ती करण्यात येऊन नवा कायदा अंमलात आला. तरी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, काळजीवाहक यांचे संवेदीकरण न झाल्याने 'ये रे माझ्या मागल्या प्रमाणे मागील पानावरून पुढे चालु अशीच स्थिती राहिली. त्याचे विदारक चित्र अतुल देसाई यांनी रेखाटले आहे. ते वाचले की कोणताही संवेदी नागरिक विकल झाल्यावाचून राहात नाही. हे या लेखनाचं यश होय.

 अनाथ, निराधार, बालगुन्हेगार मुले संस्थेत येतात. त्यांच्या पालकांचा शोध घेणे, गुन्हा का झाला हे अभ्यासणे, त्यावर उपाय होण्यासाठी वेबसाईट विकास, हेल्पलाईन, संस्थांमध्ये संगणक, इंटरनेट संपर्क असे उपाय लेखक सुचवतो ते कालानुरूप योग्य आहे. शासकीय यंत्रणा नेहमी काळामागे पन्नास वर्ष चालत असते. तिची गती वाढल्याशिवाय वंचित बालकांना न्याय मिळणार नाही. तसे झाले, घडले तर म्हणजे सुधारणा होईल तर मुलांना सोनेरी बालपण व उज्ज्वल भविष्य मिळेल, अतुल देसाई यांची बालमन, बालविकास, बालकल्याण संस्था, बालमनावर दुष्परिणाम करणारे घटक (उदा. व्हिडिओ गेम्स) या सर्वांचे विवेचन या छोट्या ग्रंथात करून आपणास बाल्य जपण्याचा, जोपासण्याचा सल्ला दिला आहे. गॅब्रियल मिस्ट्रलनी आपल्या एका कवितेत बाल्य म्हणजे 'आज'. त्यांच्या विकासाचे उत्तर ‘उद्या' कधीच होऊ शकत नसल्याचे बजावले होते. अतुल देसाईच्या या 'वादळवाटा' ही तेच सांगत आहेत. हे पुस्तक म्हणजे ‘सावध एका पुढच्या हाका' सारखं धोक्याची घंटी वाजवतंय. तो घंटानाद आपण कानभरून ऐकला पाहिजे व मन भरून वंचित बालकांसाठी काही केलं पाहिजे. अतुल देसाई त्यांच्या मनातील हा बालदीप जपतील तर अंधार दूर होणे फार दूरची गोष्ट राहणार नाही.

▄ ▄

दि. ४ जुलै, २०११

प्रशस्ती/९९