पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कोल्हापुरी रंग-ढंग(वृत्तांत संग्रह)
आप्पासाहेब माळी 
आलोक प्रकाशन, कोल्हापूर
प्रकाशन - जुलै, २०१२
पृष्ठे - १३0 किंमत - १५0/-

अश्वत्थाम्याची अस्वस्थ जखम दाखवणारं लेखन


 दैनिक तरुण भारतचे तरुण , उत्साही व निगर्वी पत्रकार अप्पासाहेब माळी यांना मी गेली अनेक वर्षे मूकपणे निरखत आलो आहे. ते मृदुभाषी, प्रसिद्धी पराङ्मुख, समर्पित व समाजशील वार्ताहर आहेत. ते अनेक कार्यक्रम, पत्रकार परिषदात उपस्थित असतात. मनस्वी टिपण, निरीक्षण असतं. त्यांचं खोचकपणा त्यांच्यात नसला तरी ते चिकित्सक, चोखंदळ निश्चित आहेत. त्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रश्नांची चांगली जाण आहे. मात्र कल आहे तो समाजहिताच्या प्रश्नांकडे! त्याचं स्वतःचं असं सर्व प्रश्नांचं निरीक्षण, आकलन व मत आहे. ते मन आणि मत आपल्या लिखाणात उतरवतात. दैनिक तरुण भारतला ते केवळ बातम्या पुरवण्याचं पाटी टाकू काम करीत नाही. आपलं वृत्तपत्र बातमी पलीकडे जाऊन वाचकाला अधिकचं, सकस, विचारप्रवण, दिशादर्शक, अंतर्मुख करणारं काही देतं का ? याचा ते नित्य विचार करत असतात. आतल्या आत पत्रकार म्हणून ते अस्वस्थ असतात. प्रश्नांविषयी त्यांचं चिंतन, मनन सुरू असतं. त्यामुळे बातम्यांच्या पलीकडे जाऊन वृत्तचित्र' (Feature) देण्यावर त्यांचा भर असतो. कोल्हापूरला तरुण भारत माझ्यासारख्या नित्य वाचकास आपलासा नि आवर्जून वाचावासा वाटतो तो आप्पासाहेब माळी यांच्या विशेष वृत्तांमुळे ! अशी शेकडो विशेष वृत्ते आप्पासाहेब

प्रशस्ती/१००