पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मार्क्सला उत्तर मिळाले, की मानवजातीच्या इतिहासात वर्गसंघर्षाचे एकसुद्धाउदाहरण मिळत नाही आणि गेल्या दहा वर्षांमध्ये, अभंग वाटणारे सर्व समाजवादी डोलारे खाली कोसळत आहेत. हे होत असताना फार मोठा हिंसाचार झाला असेही नाही. पश्चिम जर्मनीने तर, ज्या तऱ्हेने पूर्व जर्मनीला आपल्यात सामावून घेतले त्याने सगळ्या जगाला एक धडा घालून दिला. आपल्या देशातील हिंदुत्वनिष्ठांनीही हा धडा घेण्यासारखा आहे. भारत का केवळ हिंदूंचाच देश आहे असे म्हणावयाचे आहे, तर मुसलमानांना किंवा अन्य धर्मीयांना नावे ठेवण्यापेक्षा हा देश आर्थिक संघ म्हणून असा ताकदवान करा, की पाकिस्तानच काय, त्या पलीकडचे देशसुद्धा आपणहून येऊन म्हणतील, की तुमच्या या आर्थिक संघामध्ये आम्हालाही सामावून घ्या!
 राजकारणाचा दहा वर्षांचा आढावा घेताना आंतरराष्ट्रीय क्षेत्रात घडलेल्या आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीची नोंद घेणे आवश्यक आहे. आज मोठी लष्करी ताकद ही एका अर्थाने निष्प्रभ ठरली आहे. पॅरिसच्या क्रांतीच्या वेळी शेतकऱ्यांच्या हातात जी शस्त्रे होती, तीच सैन्याच्या हातात होती. त्यामुळे दोघे समोरासमोर उभे राहून लढू शकत होते. नंतरच्या मधल्या काळात लष्कराच्या हातातली साधने अशी काही झाली, की सर्वसामान्य माणूस त्याच्यापुढे उभाही राहू शकत नव्हता अशी स्थिती झाली होती; पण व्हिएतनाममध्ये अमरिकेच्या प्रचंड ताकदीचा सामना करण्यासाठी पायात बूटसुद्धा नसलेले पाच फूट उंचीचे व्हिएतनामी उभे राहिले आणि त्यांनी अमेरिकेला माघार घ्यायला लावली. आज सगळ्या जगभर वेगवेगळ्या देशांमध्ये अतिरेकी म्हणा, आतंकवादी म्हणा किंवा खडकू म्हणा, यांनी असे दाखवून दिले आहे, की ते संघटित लष्करी सामर्थ्याचा फार प्रभावी रीतीने सामना करू शकतात. ज्यांना असे वाटते, की काश्मीरचा प्रश्न लष्कर पाठवून सोडविण्यासारखा आहे किंवा पंजाबमध्ये पुरेसे कडक राहिले, तर पंजाबचा प्रश्न सुटू शकेल, त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे. हिटलरला मिळालेल्या धड्याचाच सारांश गेल्या दशकाने सांगितला, तो असा, की लहानशी जमातसुद्धा या पृथ्वीवरून नष्ट करण्याचे आजपर्यंत कुणालाही जमलेले नाही आणि कुणी लष्कर पाठवून, एक भाग नष्ट करू असे म्हणेल तर ते जमण्याची काही शक्यता नाही.

 महात्मा जोतीबा फुले यांच्या स्मृतिशताब्दीचा काळ नुकताच संपला आहे. आज भारताच्या राजकारणात जे काही घडत आहे, ते जोतीबांच्या विचारांच्या अनुषंगाने समजावून घ्यायला पाहिजे, असे मला वाटते. शंभर वर्षांपूर्वी भारतामध्ये

पोशिंद्यांची लोकशाही / १२