पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिळेल, नाही तर तुम्ही बुद्धिवादीच नाही, तुम्ही सीआयएचे एजंटच आहात किंवा कोणत्या तरी, पुराण्या जातीचेच आहात अशी हाकाटी करून, तुमचे तोंड बंद केले जायचे! काही डावा विचार मानत आहात असे म्हणायचे असेल, लोकांचे भले करायचे आहे, त्यांचा उद्धार करायचा आहे, विकास करायचा आहे असे जर तुम्हाला म्हणायचे असेल, तर त्याकरिता हा विचार मार्क्सने सांगितला आहे किंवा दुसऱ्या कोणा विचारवंताने सांगितला आहे असे म्हणत असाल, तरच तुम्हाला मान्यता मिळत असे. राजकारणातील या प्रकारच्या भोंदूपणाचे उच्चाटन गेल्या दहा वर्षांमध्ये व्हायला लागले, ही अत्यंत क्रांतिकारी अशी घटना आहे आणि याचे फार मोठे श्रेय त्या मानाने साधारण अशा दोन व्यक्तींना द्यायला हवे. एक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रेगन आणि दुसऱ्या ब्रिटनच्या पंतप्रधान थॅचर.
 करुणेने भारून, दुसऱ्यांचे भले करण्याकरिता आम्ही सार्वजनिक सेवेत आणि राजकारणात पडलो आहोत, सर्व लोकांना मदत करण्याकरिता सरकार आहे अशा धारणेला छेद देताना, त्यांनी असे म्हटले, की कुणीही असे समजायचे कारण नाही, की सरकार तुमच्या बारशाला हजर असेल, तुमच्या लग्नालाही येऊन, मदत करील आणि तुमच्या मर्तिकालाही हजर राहून, तुम्हाला मदत करील. 'The world owes you nothing' जग तुमचे काहीही देणे लागत नाही. ज्याने त्याने आपल्या पायांवर उभे राहण्याचे साध्य केले, तरच ही व्यवस्था टिकू शकते. यामुळे एका अर्थाने 'Welfarism'चा अंत झाला. त्याही पलीकडे, गेली शंभर वर्षे मार्क्सने एका हुकूमशाहीची- 'नाही रे'च्या हुकूमशाहीची कल्पना ठेवली होती. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये वर्गपद्धती मांडून, 'नाही रे'ची हुकूमशाही जेव्हा तयार होईल, तेव्हाच ही सर्व कटकट संपेल असे मानणाऱ्यांना श्रीमती थॅचरनी उत्तर दिले, की भांडवलशाहीमध्ये नोकरदार आणि नोकरी देणारे असा फरक झाला आहे, हे खरे; पण हा प्रश्न नोकरदारांना सत्ता देऊन सुटणार नाही आणि नोकऱ्या देणाऱ्यांना नष्ट करूनही संपणारा नाही. हा प्रश्न सुटायचा असेल, तर मालमत्ता असणारांची लोकशाही असणे आवश्यक आहे, 'नाही रे'ची हुकूमशाही नव्हे.

 या दोनही माणसांनी हा विचार अत्यंत विनम्रपणे मांडला आणि नजीकच्या इतिहासाचा अभ्यास केला, तर त्या विचाराची सार्थकता सिद्ध होते. गेल्या दहा वर्षांमध्ये राजकीय सैद्धांतिकदृष्ट्या 'वर्ग' ही कल्पना नामशेष झाली आहे. सर्व मानवजातीचा इतिहास हा मुळी वर्गसंघर्षाचा इतिहास आहे, असे म्हणणाऱ्या

पोशिंद्यांची लोकशाही / ११