पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खांद्यावर दिली. तेव्हा त्यांनी ॲड. वामनराव चटप आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने समाजवादाच्या वेगवेगळ्या शब्दकोशांतील व्याख्यांचा अभ्यास केला आणि थोडक्यात असं दाखवून दिलं, की 'समाजवाद' या शब्दाची नेमकी व्याख्या कोठेच दिलेली नाही. तेव्हा 'समाजवादावर विश्वास असल्याची' शपथ घेण्यात काही फार मोठा गुन्हा ठरणार नाही. त्यांनी तशी शपथ घेतली, हे योग्य केलं का अयोग्य, ते नंतर ठरवू; पण एक गोष्ट खरी, की दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या 'स्वतंत्र भारत पक्ष' या माझ्या सहकाऱ्यांच्या हुशारीमुळे मान्यताप्राप्त रजिस्टर्ड पक्ष झाला आहे. या पक्षातर्फे आपण अजून खरीखुरी निवडणूक लढविली नाही, समान चिन्ह नसताना निवडणूक लढविल्यामुळे आवश्यक ती मतांची संख्या आपल्याला मिळवता आली नाही आणि ती संख्या जमा करता आली नाही म्हणून चिन्ह मिळत नाही अशा दुष्टचक्रात हा पक्ष सापडला आहे. पण, या पक्षाला एक चिन्ह प्राधान्याने वापरण्याचा अधिकार मिळाला आहे आणि योगायोगाची गोष्ट अशी, की ज्यावेळी या चिन्हावर आपल्याला अधिकार मिळाला त्याच सुमारास ओसामा बिन लादेनचं विमान अमेरिकेच्या जागतिक व्यापार केंद्रावर धडकलं होतं. त्यामुळे 'विमान' हे चित्र एक क्रांतीचं प्रतीक बनलं. स्वतंत्र भारत पक्षाला 'विमान' या चिन्हावर प्राधान्याने अधिकार मिळाला आहे. मला अशी आशा आहे, की पुढच्या निवडणुकीमध्ये जी काही ४ टक्के मते लागतात, त्यापेक्षा अधिक मते मिळवून त्याला अखिल भारतीय पक्ष म्हणून मान्यता मिळून, 'विमान' हे त्याचं अधिकृत चिन्ह म्हणून मान्य होईल, दुसऱ्या टप्प्यात, हिंदुस्थानातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष आणि तिसऱ्या टप्प्यात भारताच्या उज्ज्वल भवितव्याच्या वाटेवर आणणारा एकमेव पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यात यशस्वी होईल.

(६ जून २००३)

◆◆


पोशिंद्यांची लोकशाही / २३३