पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१९२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तसं पाहिलं, तर माझी गुणवत्ता काहीच नाही. शेतकरी संघटना काढायला तसा मी ना'लायक'च होतो - धड शेतकरी नाही, धड शेतकऱ्याच्या जातीचा नाही; बरीच वर्षे परदेशात काढल्यामुळे मराठी वाचण्याबोलण्याचा सरावही राहिला नव्हता अशी त्या वेळची माझी स्थिती. पण, ना'लायका'ला शेतकऱ्यांनी आपलंसं केलं. महिला आघाडी बांधतानाही हाच अनुभव. यात यश किती मिळाले, त्याचा हिशेब इतिहास करील; पण जोपर्यंत आपण हरलो असं आपलं मन मानत नाही तोपर्यंत आपला पराजय कधी होत नाही असे धरून सगळीकडे मार खाल्ल्यासारखे दिसत असले; तरी नवनवीन प्रयत्न करीत राहायला हवेत, नवेनवे 'सीड प्लॉट' घ्यायला हवेत. याच विचाराने मी ही अल्पसंख्याक आघाडी बांधायचे ठरवले आहे.
 'अल्पसंख्याक आघाडी' असं नाव देताना अल्पसंख्याक म्हणजे शिख, मुसलमान, पारशी, ज्यू असे सर्व समाज मला अभिप्रेत आहेत, केवळ मुसलमान नव्हे. या सर्व धर्मीयांच्या प्रश्नांमध्ये फरक आहेत. मी पहिल्यांदा स्पष्ट करतो, 'सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र करून, एक धर्म करावा अशी माझी बुद्धी नाही. किंबहुना, कोणी असं करायचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही ठामपणे विरोध करू.'
 खरं तर वेगवेगळ्या संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत, विविधतेमध्ये काही सत्य सापडण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटनेने / स्वतंत्र भारत पक्षाने आम्हाला सरकार अजिबात नको असं नाही म्हटलं; आम्हाला एकसत्ताधारी सरकार नको असं म्हटलं आहे. निवडणूक जिंकली, की राजकारणही तुमच्या हाती, परकीय धोरणही तुमच्या हाती, अर्थकारणही तुमच्याच हाती, शाळाकॉलेजं कोणी कोठे काढायची हेही तुमच्याच हाती आणि कोठल्या गरिबांना भाकरी द्यायची हेही तुमच्याच हाती...असे सरकार आम्हाला नको. सगळ्या लोकांनी एक डोक्याला (किंवा दोन पायांना) एक मत गृहीत धरून, तुम्हाला निवडणुकीत निवडून दिलं आहे, तर तुमचा अधिकार कुठवर चालेल? तुमचा अधिकार त्याच क्षेत्रात चालेल, ज्या क्षेत्रात सगळी माणसं सारखीच असतात. सगळी माणसं सारखी कुठे असतात? प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो, प्रत्येकाला आपली मालमत्ता सुरक्षित राहावी अशी इच्छा असते. म्हणजे 'कायदा आणि सुव्यवस्था' ही एकच बाब अशी आहे, की जिच्यामध्ये सर्व लोक सारखे आहेत. तेव्हा 'एक डोके, एक मत' या हिशेबाने निवडून आलेल्या सरकारला 'कायदा आणि सुव्यवस्था' राखण्याचे काम सोडल्यास दुसरं कोणतंही काम

पोशिंद्यांची लोकशाही / १९४