पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१९३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देणं योग्य होणार नाही. कारण, त्यांनी तो अधिकार मिळवलेला नाही. फजले मतीन सारखे सबंध कुराण मुखोद्गत असलेले आणि ज्यांनी कुराण ग्रंथ कधी पाहिलेलाही नाही; पण उगाचच कुराणाच्या गप्पा मारतात, अशांना मुसलमान धर्मावरील चर्चेसाठी सारखे मानणे योग्य होईल का? मुळीच नाही. विद्वानांचं सरकार विद्वानांचं असलं पाहिजे, विद्वानांनी निवडलेलं असलं पाहिजे. गरिबांसाठी जर काही काम करायचं असेल, तर त्यासाठी, ज्यांच्या मनामध्ये गरिबांविषयी कणव आहे, एखादा उपाशी माणूस पाहिला, तर ज्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं अशा मदर टेरेसांसारख्या व्यक्तींचं सरकार असलं पाहिजे. दारिद्र्यरेषेखालील लोकांची, गरिबांची यादी करण्यामध्ये ज्यांना पैसे कमवायचे असतात, त्या लोकांच्या हाती असं सरकार दिलं, तर गरिबांचं भलं होणं शक्यच नाही. 'गरिबी हटाव'च्या नुसत्या घोषणा देऊन गरिबी हटत नाही. आपल्या देशात 'गरिबी हटाव'चा एकच कार्यक्रम यशस्वी झाला, तो म्हणजे शिख समाजाच्या गुरुद्वारातील 'लंगर'. गरिबातील गरीब माणूससुद्धा या लंगरमध्ये जमेल ते काम करून दहापंधरा दिवस जगू शकतो. या कालावधीत तो बाहेर आपल्या लायक एखादा व्यवसाय शोधू शकतो. त्यामुळे, आपल्या असं लक्षात येईल, की इतर सगळ्या धर्माचे भिकारी दिसतात; पण शिख अल्पसंख्य असले तरी, शीख धर्माचे भिकारी सापडत नाहीत. 'गरिबी हटाव'चा हा कार्यक्रम यशस्वी होण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्याकडील 'लंगर' ही कनवाळूपणाची, करुणेची संस्था राजकीय पुढाऱ्यांच्या हाती दिलेली नाही, तर ज्यांच्या हाती धर्म आहे त्यांच्या हाती आहे आणि धर्माची प्रेरणा करुणा ही आहे, मग तो धर्म कोणताही असो. 'गरिबी हटाव'सारखं करुणेचं काम, जनकल्याणाचं काम त्यांच्या हाती राहू दिलं म्हणजे ते होतं.
 आम्ही सरकार या संस्थेच्या विरुद्ध नाही. तर सरकार वेगवेगळ्या स्वरूपांत, विविध प्रकारचं असलं पाहिजे आणि तरच ते कार्यक्षम होऊ शकतं असा आमचा विश्वास आहे. शेतकरीही जाणतो, की झाडं लावायची झाली, तर एकाच प्रकारची झाडं लावू नयेत, त्यांची लागवड चांगली होत नाही. चांगली लागवड करायची असेल, तर वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली पाहिजेत. अशा वेगवेगळ्या झाडांची लागवड केली म्हणजे त्यांची तुलना करता करता आपल्याला काही समजतं, जमिनीचंही भलं होतं आणि त्या वनस्पतींचंही भलं होतं. त्याऐवजी, कोणी जर म्हणालं एकाच प्रकारची झाडं लावा - मोनोकल्चर - जसे निलगिरी, सुबाभूळ वगैरे - तर ती भलेपणाची नसेल. (भलेपणाची नसते याचा कटू

पोशिंद्यांची लोकशाही / १९५