पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहेत का? जी मंडळी गावामध्ये राहून वेगवेगळ्या प्रकारचे हुन्नर करीत होती; बलुतेदारी करीत होती, हातानं काम करीत होती, उत्पादन करीत होती, त्यांना - चांभार, लोहार, सुतार, तांबट - यांना या सगळ्या कामातनं काढून टेबलामागं बसणारे बाबू किंवा कायदेमंडळात बसणारे आमदार-खासदार बनवणं म्हणजे काही त्यांना सामाजिक न्याय देणं नाही आणि बाबूगिरी आणि लोकप्रतिनिधींच्या जागांवर किती जणांची सोय होईल? फार तर दोन-चार टक्क्यांची सोय होईल आणि मुळात गावोगाव उत्पादक कामं करणाऱ्या लोकांना शहरांकडे चला आणि नोकऱ्या करा, असं सांगणं हे सुबुद्ध दलित चळवळीचं लक्षण असू शकतं का? त्याऐवजी हुन्नरीला काही उत्तेजन मिळालं असतं आणि ते फायदेशीर ठरू लागलं असतं, तर समाजाची दलितांकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली असती. पूर्वी गावात चांभाराला हीन मानण्यात येत असे, त्याला चावडीसमोरून जाण्याची बंदी असे. आता तसं कुठं होतं का? चांभार जर श्रीमंत होऊन गावात आला तर त्याला कुणी हीनपणानं वागवण्याचा प्रयत्न करीत नाही आणि म्हणूनच शहरांकडं चला आणि नोकऱ्यात-राजकारणात राखीव जागा मिळवा हा काही खऱ्याखुऱ्या दलित चळवळीमधील कार्यक्रम दिसतात. म्हणजे नाव दलित चळवळीचं घ्यायचं; पण हेतू मात्र आपल्याला व्हॉईसरॉयच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावं असा. अशा रीतीने दलित चळवळीला एका चुकीच्या दिशेने वळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्यामुळे एक मोठा वाईट परिणाम घडून आला. जे लोक उद्योगधंदे करीत होते त्यांनी आपल्या उद्योजकत्वाचा अभिमान सोडून दिला आणि आपण अनुत्पादक सवर्णांप्रमाणे वागायला लागलो, की आपले सगळे प्रश्न सुटतील असं मानायला सुरुवात केली. एवढंच नव्हे, तर हे हुन्नर करणारे लोक नोकरवर्गीय गेल्यामुळं त्यांना समाजवादात स्वारस्य निर्माण झालं; जितक्यात नोकऱ्या जास्त तितकं बरं असं त्यांना वाटू लागलं.
 दलित समाजातून वर आलेल्या लोकांची आत्मचरित्रं बऱ्यापैकी खपतात. निदान त्यांना सरकारी पारितोषिकं भरपूर मिळतात. या आत्मचरित्रांचा पॅटर्न ठरलेला असतो. सर्वसाधारणपणे आई-वडिलांविषयी ज्या काही पवित्र, आदरांच्या कल्पनाअसतात त्यानुसार त्या दलित घरात जन्मलेल्या मुलाला त्याचे आईवडील सांभाळू शकत नाहीत. मग ते पोरगं एखाद्या गुरुजीच्या मदतीनं, मोठ्या कष्टानं थोडी विद्या संपादित करतं. सातवी-आठवी पास होतं आणि शेवटी मास्तर किंवा तत्सम नोकरी मिळाल्यानंतर त्याचा प्रश्न आपोआपच सुटतो. सर्वसाधारणपणे सर्व दलित आत्मचरित्रांचा पॅटर्न असाच असतो. आता सगळ्या

पोशिंद्यांची लोकशाही / १६३