पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होईल इतक्या बेताने एकेका गोत्रांतील घराण्यांचे गट पाडून तशा गटवारीने वृत्तान्त तयार करावे, तसा प्रयत्न केल्यास अखिल चित्तपावन घराण्यांचे वृत्तान्त तयार होतील. कुलवृत्तान्तकारांस कांहीं सूचना - आतांपर्यंत जे कुलवृत्तान्त प्रसिद्ध झाले आहेत ते चाळून पाहून त्या संबंधांत दोन सूचना कराव्याशा वाटतात. ऐतिहासिक माहिती म्हणून जे कागदपत्र प्रसिद्ध केले गेले आहेत त्यांत इनाम जमिनीच्या अथवा हक्कदारीच्या तंटयाबाबतचे कागदपत्र पुष्कळच छापलेले आढळतात. ही भाऊबंदांची भांडणे आपल्या पांचवीलाच पुजलेली आहेत व त्या पासूनचा मनस्ताप आपण नित्यशः अनुभवीत असतोच. मग त्या भाऊबंदकीला कुलवृत्तान्तांत एवढी जागा देऊन आपणास लाभ काय ? हा जागेचा व द्रव्याचा अपव्यय होय. भाऊबंदकीच्या तंटयांचा तपशील देऊन शेवटी निष्कर्ष हाच निघणार कीं या तंट्यांत झालेल्या खर्चाच्या पायीं शेवटीं तें इनाम अथवा ते हक्क हातचे घालविण्यांत आले ! यास्तव या बाबतींत असे धोरण ठेवावें कीं, मूळ इनाम अगर हक्क अथवा पदवी ज्याने संपादन केली त्याच्या कर्तृत्वाचा उल्लेख करून तेवढ्या पुरताच सनदेचा भाग प्रसिद्ध करावा आणि त्यानंतर तंटाबखेडा निर्माण झाला असल्यास अमक्या पिढीत तंटाबखेडा झाला व शेवटीं इनाम राखले असल्यास ज्याने राखले अथवा हातचे गमावले असल्यास ज्याने गमावले त्या व्यक्तीचा तेवढा नामनिर्देश कालनिर्देशासह करावा. यापेक्षा अधिक तपशीलवार कागदपत्र छापण्याची जरुरी नाहीं. अशी काटकसर केल्यास छपाईच्या खर्चात बरीच बचत होईल, दुसरी सूचना अशी की, कुलवृत्तान्तांत स्त्रियांच्या बरोबरीच्या हक्काची जाणीव ठेवलेली दिसत नाहीं. पुरुष व्यक्तींचीच तेवढीं नांवें सूचींत दिली जातात, स्त्रिया या पुरुषांच्या अर्धागीच असल्याने पुरुषाच्या नांवांत त्यांचाहि समावेश झालाच असे म्हणता येईल, हे समर्थन कांहींसें खरे आहे. तथापि सर्वच ठिकाणी पुरुष हाच कुटुंबाचा कर्ता असतो असे नाहीं. एकत्र कुटुंबाची पद्धति जारी होती त्या वेळीं स्त्रियांच्याकडे कर्तेपण येत नसे हे खरे. पण आतां एकत्र कुटुंबाची ती पद्धत मोडत चालली आहे आणि जेथे कुटुंबाचा कर्ता पुरुष गत होतो तेथे कुटुंबाचा भार स्त्रियांच्यावरच पडतो आणि अशा परिस्थितींत अनेक स्त्रियांनी आपल्या कर्तबगारीने मुलांचे संगोपन करून ते कुटुंब ऊजितावस्थेस आणलेले असते. अशा स्त्रियांचा उल्लेख त्या त्या कुटुंबांत पुरुषांच्या जागी केला जावा हें उचित आहे. याशिवाय अलीकडे स्त्रियांच्या शिक्षणाची मजल वाढत चालली आहे आणि एकत्र कुटुंबात देखील कित्येक स्त्रियांकडून कुटुंब पोषणाच्या कामीं साहाय्य होत असते. अशा स्थळी स्त्रियांच्या व्यवसायाचाहि नामनिर्देश केला जावा. ।