पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भृगुकुलोत्पन्न पेंडसे आतां ऋग्वेद म्हणजे काय ते पाहू :- ज्या श्रुतिवाङ्मयाला मंत्रवाड्मय म्हणून एक सामान्य नाम शोभेल, अशा वाङ्मयाचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद असे कारणपरत्वे केलेले वेगवेगळे भाग होत. वेदकालीन संस्कृतीचा मध्यबिंदु यज्ञ हा होता आणि त्याच्यासाठी जे वेगवेगळे मंत्र लागत त्याचे ऋक् (आवाहनाचे मंत्र), यजूस (आहुति देतांना म्हणण्याने गद्यमंत्र), सामन् (यज्ञ करतांना गाऊन म्हणण्याचे ऋचांचेच केलेले वेगवेगळे गानभेद) आणि अथर्वन् (आपल्याकरितां शुभ तसेच शत्रूविरुद्ध अशुभ गोष्टी उत्पन्न व्हाव्या म्हणून जपाकरितां उपयोगांत येणारे जादूसारखे मंत्र) असे विनियोगपरत्वें भाग होते. आणि या चारही प्रकारच्या मंत्रांचा उपयोग अनुक्रमें होता, अध्वर्यु, उद्गाता आणि ब्रह्मा हे यज्ञांतले ऋत्विज करीत असत. होता पठनाने देवांचे आवाहन करी, अध्वर्यु यजुर्मत्र म्हणून आहुति यज्ञात टाकी; उद्गाता सामगान करी व ब्रह्मा आपल्या अथर्ववेदाच्या ज्ञानाने या सर्व कर्माचे अध्यवेक्षण ( superintending) करीत असे. अशा रीतीने मंत्र वाङमयाचा यज्ञांत उपयोग केला जाई व कोणाही नत्विजास त्याला हवे ते काम करता येत असे. फक्त त्याला कारणपरत्वे ऋक्, यजुस्, सामन् इत्यादिकांचा उपयोग करावा लागे. अर्थातच याज्ञिक संस्कृति जसजशी वाढत गेली व प्रत्येक ऋत्विजाचा व्याप जसजसा वाढत गेला तसतसे प्रत्येक ऋत्विजाला एक विशिष्ट कार्य करणेच सोयीचे व्हावयाला लागले व कांहीं केवळ होत्याचेच काम करणारे, कांहीं केवळ अध्वर्युचेच काम करणारे असे त्यांचे वेगवेगळे वर्ग पडले. आणि मग ओघानेच प्रत्येकाला आपआपलें मंत्रभांडार, एकत्रित करण्याची जरूरी पडली. अशा रीतीने ऋचांचा संग्रह ऋग्वेदांत, यजूंचा यजुर्वेदांत, सामांचा सामवेदांत व अथर्वाचा अथर्ववेदांत करण्यांत आला. स्थूलमानाने ही उपपत्ति वेगवेगळे वेद कसे झाले हे समजण्यास उपयोगी पडेल. (दुस-या कित्येक शास्त्रीय व्युत्पत्त्या विस्तारभयास्तव येथे देत नाहीं.) अर्थात् ऋग्वेद म्हणजे होत्याला देवांना आवाहन करण्यासाठी पठण कराव्या लागणा-या ऋचांचा संग्रह. अशा संग्रहांनाच संहिताकरण म्हणतात. निरनिराळ्या ऋषींनी आपणांस इष्ट व अनुकूल असणा-या मंत्रांचे एखाद्या विशिष्ट प्रकारे एकीकरण करावे असा प्रकार सुरू झाला ; आणि त्या काली विद्या ही केवळ मुखपरंपरेनें प्रसुत होत असल्या कारणाने अशा त-हेच्या संहिता करण्याच्या कामीं कांहीं पाठभेद, मतभेद इत्यादि उत्पन्न होणे अगदी अपरिहार्य होते, आणि शाखा भिन्नत्वाचे कारण हेच होय. उदाहरणार्थ, आपल्या ऋग्वेदापुरते बोलावयाचे झाल्यास त्याच्या पांच वेगवेगळ्या संहिता होत्या असे एके ठिकाणी सांगितले आहे. (पतंजलीच्या मते एकवीस होत्या). जो ऋषि अशी एक संहिता विशिष्ट पाठभेदांची व विशिष्ट रचनातत्त्वावर उभारलेली निर्माण करीत असे किंवा संपादित असे त्यालाच शाखाप्रवर्तक असे म्हणत. शाकल या नांवाच्या कृषीने