पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१६) लागेल. तेव्हां ही भावी स्थिति अगाऊ जाणून ज्यांच्या अंगीं सुदैवाने हे धर्मकार्य व समाजकार्य करण्याची पात्रता आहे त्यांनी ती गाफिलपणाने हातची गमावून पश्चात्तापांत पडण्याची पाळी ओढवून घेऊं नये एवढ्या करितांच ही दीर्घसूचना देण्यात येत आहे. आपद्ग्रस्त साहाय्यक कुलसंघ कुलवृत्तान्तापासून त्या त्या कुलांतील पुढारी वर्गाने हा बोध घेतला तरच असले कुलवृत्तान्त प्रसिद्ध केल्याचे सार्थक होणार आहे. याशिवाय दुसरेंहि एक व्यावहारिक कार्य कुलांतील पुढा-यांनीं कालापहरण न करितां बजावले पाहिजे. कुलवृत्तान्तांत कुलांतील प्रत्येक कुटुंबाची नोंद आहे व त्यामुळे त्या प्रत्येक कुटुंबाशीं सर्वांचे आपलेपणाचे नाते जोडले गेले आहे. यास्तव कुटुंबांतला कर्ता मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबांतील बाल, वृद्ध, अपंग व्यक्तींची काळजी वाहतो त्याप्रमाणे कुलांतील सुस्थितीतील कुटुंबीयांनीं दुःस्थितीतील कुटुंबांचा समाचार घेतला पाहिजे. आपण जर पेंडसे कुलांतील आजच्या विद्यमान दोन हजार व्यक्ति में एक कुल असे अभिमानाने म्हणतों, तर आपल्या कुलांतील कोणत्याहि व्यक्तीने अडचणीच्या प्रसंगी आपल्या कुलाबाहेर परक्यापुढे याचना करता कामा नये. स्वकीयांची काळजी स्वकीयांनीच वाहिली पाहिजे. या संबंधांत पारसी लोकांचे उदाहरण कित्ता घेण्याजोगे आहे. कोणीहि आपद्ग्रस्त पारशी अन्य समाजापुढे हात पसरीत नाही व तोंड वेगाडीत नाहीं. पारसी समाजांतच त्याच्या निर्वाहाची तरतूद केली जाते. त्यास अनुसरून ज्या ज्या कुलांचे वृत्तान्त प्रसिद्ध झाले त्यांनी आपल्या कुलांतील सर्वांचा यथायोग्य परामर्श घेण्याकरितां एक संस्था निर्माण केली पाहिजे. कुलवृत्तान्त संघ निर्माण झाला आहे व तो कुलवृत्तान्त लेखनाच्या कामी मार्गदर्शन करतो. परंतु कुलवत्तान्त प्रसिद्ध करूनच काम भागत नाही. त्याबरोबरच कुलांतील सर्व व्यक्तीच्या सुखदु:खाची जबाबदारी कुलांतील पुढा-यावर येऊन पडते. ती पार पाडण्याकरिता कुलांतील अनाथांचा समाचार घेऊन त्यास मार्गदर्शन करणारा एकेक कुलाचा एक मध्यवर्ती संघ स्थापन झाला पाहिजे. आपटे व भावे या कुलांचे असे संघ स्थापन झाले आहेत. त्यांतून भावेसंघाने तर एक पाऊल पुढे टाकून दहा हजार रुपयांचा निधि जमवून त्याच्या व्याजांतून भावेकुलांतील विद्यार्थ्यांना शिक्षणार्थ साहाय्य देण्याचा स्तुत्य उपक्रम केला आहे. आतापर्यंत जेवढ्या कुलांचे वृत्तान्त प्रसिद्ध झाले त्या त्या कुलांतील पुढा-यांनी याचे अनुकरण करावे आणि जे कुलवृत्तान्त यापुढे प्रसिद्ध होऊ घातले आहेत त्यांतील पुढा-यांनी कुलवृत्तान्ताबरोबरच असा संघ स्थापन केल्याचे जाहीर करावे आणि आपल्या कुलांतील आपद्ग्रस्तांना साहाय्य करण्याचे केंद्र प्रस्थापित करावे.