पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२) धर्मकृत्ये चालविणारे वैदिक मिळत नाहीत म्हणून धार्मिक विधि करण्याचे टाळावे लागते त्यामुळे अनिच्छेने धर्मकृत्यांचा लोप होतो. धार्मिक कृत्यांकडे गृहस्थांचे लक्ष कमी होण्याला एक कारण धार्मिक विधि यथाशास्त्र, व मनःपूर्वक करणारे वैदिक मिळत नाहीत हे आहे. अर्थातच भिक्षुकी चालत नाही ही तक्रार अंशतः खरी असली तरी ती पूर्णाशाने खरी नाहीं. पूर्वीच्या इतक्या प्रमाणांत ती फायदेशीर चालू शकणार नाहीं हे खरे. पण एकंदर गृहस्थ कुटुंबांच्या संख्येच्या मानाने शेकडा ३ तरी वैदिक घराणीं अवश्य असून त्यांचा निर्वाह चांगला चालेल. दुसरे एक तत्त्व हल्लीच्या काळांत लक्षात घ्यावें कीं, कोणत्याहि एका धंद्याला दुसरा एक जोड धंदा पुष्टिपत्रासारखा जोडावा लागतो. नोकर पेशांतले लोकहि उत्पन्नांत भर टाकण्याकरितां एखादा जोडधंदा करीत असतात. त्याप्रमाणे भिक्षुकांनीहि भिक्षुकीच्या जोडीला एखादा शिवणकामाचा, धार्मिक पुस्तक-विक्रीचा, लेखनाचा असा जोडधंदा कां करू नये? सरकारी वा इतर नोकरी मिळत नाही म्हणून मॅट्रिक झालेले गृहस्थ प्रौढ वयांत याज्ञिकी शिकून भिक्षुकी करू लागलेले पाहण्यांत आहेत. तेव्हां वैदिक परंपरा चालू ठेवणारा एकेक वैदिक तरी तयार करावा. आणि त्या धंद्यांत गर्दी होऊ नये म्हणून इतरांना इतर व्यवसाय करण्याचे शिक्षण द्यावे. आणि जे कोणी आजमितीला भिक्षुकी करीत असतील त्यांनी त्यावर निर्वाह चालत नाही म्हणून तो व्यवसाय अजीबात टाकण्यापेक्षा आपण दुसरा कोणता व्यवसाय फावल्या वेळांत करून कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालू शकू ते पाहून तसा एखादा आपल्याला साजेसा जोडधंदा करून वैदिकी चालू ठेवावी. दुसरीहि एक सूचना करणे अगत्याचे वाटते की, भिक्षुकी करणा-यांनी आपल्या प्रांतांत किंवा शहरांतच राहण्याचा आग्रह कां धरावा. जसा नोकरीवाला इसम कोठेहि नोकरीसाठी जातो त्याप्रमाणे भिक्षुकांनीहि जेथे कोठे हिंदूंची थोडी बहुत स्थाइक वस्ती असेल तेथे आपणहि जाण्याची तयारी ठेवावी. मराठ्यांच्या स्वराज्याच्या स्थापनेपासून भिक्षुकांना इनामें व रोख दक्षिणाहि बरी मिळू लागली, पण तत्पूर्वी शतकानुशतके भिक्षक वर्ग कोंकणांत तरी निदान स्वतः शेतीवर उदरनिर्वाह करून वेदाध्ययन करीत होता. त्याप्रमाणे आतांहि पर प्रांतांत नवीन वसाहतीच्या स्थळीं पूर्वीच्या प्रमाणेच शती व भिक्षुकी असे दोन्ही धंदे त्यांनी का चालवू नयेत ? अगदी अलीकडील बदललेल्या वातावरणावरून कित्येकांची अशी समजूत झाली आहे कीं; या पुढे ब्राह्मणांना खेडेगांवांत राहाणे परवडणार नाही. परंतु ही समजूत चुकीची आहे. कोल्हापूर व सातारा या दोन भागांतील विशिष्ट चळवळीमुळे ब्राह्मण कुटुंबांवर संकट ओढवली व त्यांत खेड्यांतील ब्राह्मणांचे अतोनात नुकसान झाले हे खरे. परंतु ब्राह्मणेतरांची ही मनोवृत्ति सार्वत्रिक नव्हे आणि सार्वकालिकहि नव्हे.