Jump to content

पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
कै. इतिहासाचार्य राजवाडे.

महनीय कामगिरी केली, त्यांस आम्ही दूषणे दिलेली ऐकावी व त्यांचीच स्वतः री ओढावी इतका आमचा अधःपात कशाने झाला? अशाप्रकारचे शेकडो कल्लोळ उडविणारे विचार राजवाडे यांच्या हृदयसमुद्रांत उसळत असत. याच क्षेत्री हिंडतां फिरतां त्यांस शहाजी, शिवाजी, रामदास, बाजी यांची स्मृति जळजळीत स्फुरली असेल. येथेच बसतां उठता आपले वैभव त्यांच्या कल्पना दृष्टोस दिसले असेल व तें दिव्य वैभव, तें यशोगान पुनरपि गावयाचें असें त्यांनी ठरविलें असेल!
 राजवाडे कॉलेजांत राहिले त्यामुळे शरीर कणखर बनलें; बुद्धि प्रगल्भ, कुशाग्र व अनेक विषयावगाहिनी बनली. १८८४ च्या शेवटी कोणत्याच परीक्षेस न बसतां ते कॉलेज सोडून गेले. पुढे १८८८ मध्ये बाहेरचा विद्यार्थी म्हणून पहिल्या बी. ए. च्या परीक्षेस ते गेले व पास झाले. ह्या परीक्षेचा सर्व अभ्यास २०/२५ दिवसांतच त्यांनी केला. पुढे १८८९ मध्ये भावे यांच्या शाळेंत ते वनस्पतिशास्त्र शिकवीत होते. एक वर्षभर हें काम करून पुनरपि १८९० मध्ये ते डेक्कन कॉलेजमध्ये रहावयास गेले. इतिहास हा विषय ऐच्छिक घेऊन ते परीक्षेस बसणार होते. हा विषय शिकविणारा कोणी शिक्षकच तेथे नसल्यामुळे वर्गांत जाण्याची अजिबात जरूर राहिली नव्हती. राजवाडे लिहितात "निव्वळ कॉलेजांतील खोलीचा, हवेचा व जवळील नदीचा उपयोग करून घेण्याकरितां मी ८० रुपये फी भरली. कॉलेजांत राहून तनु दुरुस्ती करावी, हा माझा तेथें राहण्यांत उद्देश होता. १८८९ च्या डिसेंबर महिन्यापासून ते १८९० च्या आक्टोबरपर्यंत तेथेच