Jump to content

पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७
जन्म, बालपण व शिक्षण.

माने यांनीं बखरी सारखें सुंदर हृद्य व जोरदार वाङ्मय छापावयास घेतले, त्यावेळेस मराठीचे पाणिनि दादोबा आश्चर्यचकित होऊन म्हणाले, "आं, असें सुंदर वाङ्मय मराठीत आहे!" स्वदेश व स्वभाषा यांबद्दल अभिमान ज्यांनी या भावी महापुरुषाच्या हृदयांत उद्दीप्त केला ते खरोखर कृतार्थ होत.
 ज्या कॉलेजमध्ये राजवाडे शिकत होते, त्याची आजूबाजूनी स्थिति चित्तवृत्ति विषण्ण करणारी होती. ज्या लढायीनें पुण्याचे पेशव्याचें राज्य गेलें, तो लढायी येथेच झाली. तेथें हिंडत असतां पुढील आयुष्यांत पूर्वजांची स्मृति जागृत करणाऱ्या या थोर पुरुषास फार उद्विग्नता प्राप्त होई. याच पुणे शहरांत इंग्रजांचे वकील हातरुमाल बांधून पेशव्या समोर सविनय जाऊन उभे रहात; याच पुण्यांतील प्रतापी वीरांनी अटकेपर्यंत अंमल बसविला; याच पुण्यांतून हिंदुस्थानची सूत्रे खेळविली जात. परंतु काळाचा महिमा अतर्क्य! सातहजार मैलांवरचे गोरे लोक येथे येऊन आम्हांस गुलाम करून राहिले आहेत; त्यांनीं स्थापन केलेल्या शाळा कॉलेजांतून त्यांनी लिहिलेली पुस्तकें पढत आहोंत! आमचे लोक त्या रणरंगधीर पूर्वजांची पूज्य दिव्य स्मृतिही विसरून गेले व त्यांस लुटारू, दरवडेखोर, खुनी, लबाड असली शेलकीं विशेषणे पाश्चात्यांनी दिलेली खरीं मानूं लागले! हरहर! काय आमची दुर्दशा! समरचमत्कार जरी सद्यः कालांत शक्य नसले, घोड्यावर अढळ मांड ठोकून समशेर लटकावून व भाले सरसावून पुन्हा दिगंत झेंडा मिरवितां येणें सद्यःस्थितीत शक्य नसले, तरी ज्यांनी ती