Jump to content

पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
कै. इतिहासाचार्य राजवाडे.

माझा ग्रंथ लिहिणार नाहीं. मी कीर्तींचा हपापलेला नाहीं." चिपळूणकर, दीक्षित, राजवाडे यांसारखी भाषाभिमानी माणसें ज्यावेळेस अनेक उत्पन्न होतील, भाषाभिमानाची कडवी रजपूती कृति जेव्हा आमच्यांत उद्भूत होईल, त्यावेळेसच आमची भाषा सजेल व सुंदर होईल. कीर्ति पैसा यांची अपेक्षा ठेवून मराठी संपन्न होणार नाहा. मराठीत जें अमोल प्राचीन काव्य आहे, तें अर्थाभिलाषी कविवरांनीं विनिर्मिलें नाहीं. ज्ञानेश्वरांसारख्या वागीधरांनी आपल्या आमृतासमान ओव्या कोळशानें खांबावर लिहिल्या; दासोपंतानें निंबाचा पाला खाऊन लक्षावधि ग्रंथ लिहून ठेविला. या प्राचीन वाग्वीरांप्रमाणें निःस्वार्थ होऊन ज्यावेळी आम्ही लिहावयास लागूं त्यावेळेस मराठी समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही. परंतु करावयास जो तयार होईल त्याला खरी मायभाषेची माया पाहिजे; प्रेम पाहिजे; आस्था व अभिमान पाहिजे. आचार, विचार, भाषा यांत परकीयत्व स्वीकारल्यामुळे स्वजनांपासून आपण कसे दूर जात चाललों, व सुशिक्षित ही एक नवीनच जात कशी निर्माण झाली आहे हें दिसून येतें; असहकारितेपासून पुन्हां लंबकास विरुद्ध दिशा मिळू लागली आहे. सारांश राजवाडे यांनी वरील अवतरणांत जें लिहिलें आहे तें अगदी निर्विकार दृष्टीने पाहिले व दूरवर विचार करून पाहिलें तर पटेल असें वाटतें.
 निबंधमाला, नवनीत, व काव्येतिहाससंग्रह या त्रयीनें आपणांस राजवाडे दिले. निबंधमालेनें एक राजवाडे दिला एवढ्यानेंच निबंधमाला कृर्तकार्य झाली. तत्कालीन व तत्पूर्वकालीन नवसुशिक्षितांस प्राचीन इतिहास, काव्य सर्व अज्ञातच होतें. ज्यावेळेस रा. ब.