प्रकरण दुसरें,, रघुवंशांतील कथेशी जुळत आहे असे कित्येकांचे मत आहे ! यांतील रामाश्वमेधाचे प्रकरण मात्र नवीन आहे असे विल्सनचें मत आहे. पद्म- पुराणांत मोठाल्या लांबलचक कथा अशा आहेत, की त्या कित्येक भारतांतील कथांशी जुळतात. भारत, वनपर्व-यांतील तीर्थवर्णनाचा बराच भाग पद्मपुराणांतील तशाच भागांशी जुळतो, असें दुसऱ्या एक युरोपियन शोधकाचें मत आहे. पद्मपुराणांतील रामकथा रामायणाप्रमाणे नसून रघुवंशांतील कालिदासाच्या कथेप्रमाणे आहे, असे कित्येकांचें मत वर दिलेलेच आहे ! कांहीं ठिकाणीं पद्मपुराण व कालिदास यांची शब्दरचना- देखील सारखी आहे असें म्हणतात ! तसेंच, शकुंतलेची कथा महाभारता- प्रमाणे या पुराणांत नसून, कालिदासाच्या शाकुंतल नाटकांतील गोष्टी- प्रमाणे आहे, असे म्हणतात ! या गोष्टींचा शोध करून पहाणें मला झालें नाहीं. पुढच्या शोधकांसाठी माहिती देऊन ठेविली आहे. एवढे • मात्र खरें कीं, अशी तुलना केल्यानें कित्येक वेळां नवा प्रकाश पडून ग्रंथांच्या त्या त्या भागांचे काळ ठरूं शकतात. कालिदासाच्या रघुवंश व शाकुंतल यांतील कथांशी जर पद्मपुराणांतील कथांचें साम्य असेल तर दोन गोष्टी संभवतात. ( १ ) कालिदासापेक्षां पद्मपुराणांतील कथांचें हैं स्वरूप प्राचीनतर असून कालिदासानें या गोष्टी या पुराणांतून घेतल्या ! ( २ ) किंवा कालिदासानंतर पद्मपुराणांत या गोष्टी घालण्यांत आल्या ! या दोहोंपैकी कोणता विचार पत्करावा हैं शोध करून पाहिल्याखेरीज कळावयाचें नाहीं.
पद्मपुराणांतील पातालखंडांत रामाश्वमेधपर्व म्हणून एक पर्व आहे; त्याच्या ६५ व्या अध्यायांत वाल्मीकीनें रामायण कसे व केव्हां रचिलें हें सांगत असतां, ओघांत वाल्मीकिरामायणाचें कांडश: सार दिलेलें आहे. त्यांत बालकांडांतच अयोध्याकांडाचा समावेश असून बालकांडा- नंतर लगेच आरण्यकांड आलेले आहे; पहा:--