पान:पुत्र सांगे.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझ्या धाकट्या भावाला रवीला उद्देशून केलेली आहे. तो जन्मला तेव्हा त्याचे वजन अवघे पावणे तीन पौंडाचे होतें. त्याच्या जपणुकीसाठी आई दादांनी अपार कष्ट घेतले. त्यामुळेच त्याला घरी पाळण्यात ठेवून नोकरीवर जाताना आईच्या मनाला अपरंपार कष्ट होत. त्यातूनच त्या कवितेचा जन्म झाला आहे. शिक्षकी पेशा हा संसाराला हातभार म्हणून आईने स्विकारलेला असला तरी नंतर तो तिचा एक ध्यास बनला. केशवसुतांच्या चालीवरच तिने कवितेत म्हटलं आहे.

 "आम्ही कोण म्हणून काय पुसतां, आम्ही असूं शिक्षक"

 माझी आई शाळेच्या वातावरणात, तन-मनाने किती गुंतली होती हे मी अनेकवार अनुभवलेले आहे. पूर्वी व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा म्हणजे मराठी सातवीची अंतिम परीक्षा. मग त्यानंतर शिक्षिका आणि विद्यार्थिनींचा संबंध सुटायचा. निरोप समारंभाच्या वेळी आईच्या विद्यार्थीनी इतक्या रडायच्या की त्यांचे आणि आमच्या आईचे डोळे लालीलाल व्हायचे. तेवढं 'पुरायचं' नाही म्हणून की काय त्याच मुली पुन्हा घरी येत. मग आई आणि तिच्या त्या विद्यार्थीनी पुन्हा पर्हिल्यापासून रडत बसत !

 मग त्याचं सावट दिवसभर साऱ्या घरावर असे !

 सगळ्या कविता पाहताना आता हळहळ वाटते की तिच्या उडून गेलेल्या सगळ्या चिटोऱ्या हाती लागल्या असत्या तर ......

 काव्य आमच्या आईच्या रक्तातच होतं. मृत्यूच्या आधी (फक्त आठच दिवस) तिने माझ्या मावसबहिणीच्या लग्नासाठी सुरेख मंगलाष्टके आणि विहीणीचं गाणं रचलं होतं, नुसतं रचलं नाही तर त्यांच्या चालीचं नोटेशन लिहून ठेवलं होतं.

 या नोटेशनवरुन आठवलं. माझी आई चांगली गायिका होती. सांगलीचे राजगवई दिनकरबुवा गोडबोले (प्रख्यात रंगभूमी अभिनेते उदयराज गोडबोले यांचे वडील) आणि पं. चिंतुबुवा म्हैसकर यांजकडे तिचं संगीत - शिक्षण झालं होतं. वारंवार उपटणारी दुखणी, मुलांचे आजार यामुळे तिच्या संगीतशिक्षणात खंड पडे. छोट्या मोठ्या बैठकी तिने केल्या होत्या. संगीताच्या परीक्षा तिनं दिल्या होत्या. ख्यालगायनापर्यंत तिची तयारी झाली होती. पं. विनायकबुवा पटवर्धन, मा. कृष्णराव यांसारख्या दिग्गजानी तिच्या आवाजाची, गाण्याची खूप वाखाणणी केली होती. पुण्यात येऊन शिकण्याचा आग्रहपण केला होता. पण...

 "अत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणाम् मनोरथाः ।"

(७७)