पान:पुत्र सांगे.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केला. तेव्हा कुठं आईच्या या वेगळ्या पैलूचा साक्षात्कार आम्हाला झाला !

 बरं, तिच्या कविता म्हणजे उगाच मुक्तछंदात, इकडून तिकडून जोडलेले शब्द नव्हते. तर दिंडी, गझल, अभंग, भूपतिवैभव, शार्दूलविक्रीडित अशा विविध छंदांमध्ये तिने दर्जेदार रचना केल्या आहेत. हे माझं मत नाही तर त्या काव्यसंग्रहातील कवितांवर प्रसिध्द झालेली परीक्षणंच असं सांगतात. या संग्रहातील एका कवितेत, आपल्या पाळण्यात झोपलेल्या आणि नोकरीवर जाताना नकळत हात घट्ट पकडणाऱ्या बाळाला उद्देशून तिनं म्हटलंय,

 

“नको रडू माझ्या राजा, सोड सोड हात,
किती सांगू तुजला काय मन्मनात ! "

 आपल्या तान्ह्या मुलाला मंद मंद झोका देऊन झोपवावं, गाणं म्हणून जोजवावं..... असं कांही आईला वाटत नसेल कां ? पण तिची आर्थिक दुर्बलतेपोटीची अगतिकता, बाळाला कशी समजावी ? म्हणून ती बाळाला पुढे म्हणतेय,

 

"कसे कळो यावे तुजला माय तुझी बंदी
कचेरीच्या कामाचा तो सदा भार स्कन्धी
तुला असा ठेवोनिया जात, राजसा रे
नको म्हणूं आई माझी दयाहीन तू रे
रमू कशी तिथल्या कामी ? सदा ध्यानि तूंच
परी आंच कर्तव्याची अन्तरात साच"

 त्या संग्रहात शिक्षकी पेशात काम करत असताना आलेल्या अनुभवांचे मनोज्ञ चित्रण आहे. शाळेत चिवचिवाट करणाऱ्या मुला-मुलींच्या गमती आहेत. निसर्गवर्णन आहे. गरीबीचे चटके सातत्याने भोगायला लागणाऱ्या मनाला "सुख सुख" म्हणतात ते काय असावं याचा एकदा तरी सुखद अनुभव मिळावा असं वाटणारी आई म्हणते की,

'आभाळा रे आभाळा
प्रसाद दे तर तव जादूचा ।
सौख्य कसे ते पाहू एकदा ॥"

 या तिच्या सगळ्या कविता अनुभवातून साकारलेल्या आहेत आणि म्हणून त्या रसरशीतपणे प्रकटल्या आहेत. “नको रडू माझ्या राजा" ही कविता

(७६)