पान:पुत्र सांगे.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भेटायला येणारी मंडळी मुद्दाम बोलत असे नाही पण अशा मरणाविषयीच्या गप्पागोष्टींमुळे आईला किती त्रास होत असेल ? या विचाराने आम्ही चिडचिडे होत असू. पण आई शांत असे. कोणताही त्रागा तिच्या वागण्यात नसे. दोन - चार दिवसाच्या आजाराने चिडचिडी होणारी आणि दुसऱ्यांचा जीव, त्या चिडचिडीपोटी नकोसा करणारी माणसं, मी अनेक बघितली आहेत. त्या पार्श्वभूमीवर आईच्या सोशिकतेचे आणि शांतपणाचे अप्रूप मला अधिक जाणवत असे. त्या दुखण्याच्या काळातच, माझ्या धाकट्या भावाच्या बायकोचे डोहाळेजेवण, बारसे असे कार्यक्रम आईने अगदी कार्यालय घेऊन थाटामाटात केले. रोजच्या वागण्यात बोलण्यात ही बाई कॅन्सरची पेशंट आहे आणि मृत्यू आपले पाश तिच्याभोवती घट्ट घट्ट आवळत चाललाय याची सहसा कुणाला चटकन कल्पना येत नसे. अनेक गुणकारी औषधांमुळे, आजकालचे कॅन्सर पेशंट्स तुलनात्मक दृष्ट्या त्यातल्या त्यात होणाऱ्या वेदनांना, आरामात थोडं तरी तोंड देऊ शकतात. पण पंचवीस वर्षापूर्वी आणि त्यातसुध्दा सांगलीसारख्या गावात एवढ्या सुविधा नव्हत्या. आईचं म्हणून मला अधिक कौतुक वाटतं. तिच्या वेदनांची आणि तडफडीची खरी कल्पना माझ्या वडिलांना अधिक होती. त्यामुळे आपल्या प्राणप्रिय पत्नीला लौकर सोडव अशी ते रोज परमेश्वराला प्रार्थना करीत. त्यांच्या याचनेला ओ देऊन ईश्वराने आईला आमच्यापासून ओढून नेले. कॅन्सर कळल्यापासून अवघ्या सव्वा वर्षातच. स्वातंत्र्यासाठी फाशीवर चढणारा क्रांतीकारक, ज्या असामान्य धैर्याने मृत्यूचा सामना करतो तसे विलक्षण धैर्य माझ्या आईने दाखवलं. सामान्यातील असामान्यत्व तिनं दाखवलं.

 पण माझी आई सामान्य नव्हतीच !

 ती उत्तम गायिका होती, कवयित्री होती. सहज जाता येता, तांदूळ निवडता निवडता, कधी ती कविता करायची याचा आम्हाला पत्ताच नसायचा, तीसुध्दा कधी सांगत नसे. कवितेचे असे अनेक चतकोर वाऱ्यावर उडून गेले. असतील. एकदा त्यातील कांही तुकडे, तिची जिवलग मैत्रीण श्रीमती राजमतीबाई पाटील (अलीकडेच 'सांगली भूषण' किताबाने सन्मानित झालेल्या) यांनी बघितले. एवढ्या चांगल्या कविता अक्षरश: वाऱ्यावर उडून जाताना बघून त्यांचा जीव हळहळला. त्यांनी हाती लागलेले चिटोरे एकत्र केले आणि 'गीतरेखा' या शीर्षकाचा आईचा एक काव्यसंग्रह स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी प्रकाशित

(७५)