पान:पुत्र सांगे.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेवढीसुध्दा सोय ठेवली नव्हती.

 कारण कॅन्सर घशाचा होता !

 डॉक्टरांच्या अंदाजापेक्षाही अधिक झपाट्यानं कॅन्सर तिच्या शरीरात पसरला. मऊ भात नाही, खीर नाही, दूध नाही असं होता होता आईला थेंबभर पाणी गिळणेसुध्दा मुष्किल झालं. उपासमार होऊ लागली. तिला मरणाचे वेध लागले होते आणि आम्ही तिला वाचविण्यासाठी धडपडत होतो. अशा उपासमारीमुळे तिचे हाल होणार होते. जीवाची तडफड होणार होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला पोटामध्ये ट्यूब बसवणं आवश्यक होतं. तिची इच्छा नव्हती. पण आम्हां सर्वांच्या आग्रहाने त्या छोट्या ऑपरेशनला ती तयार झाली. पोटाला भोक पाडून नळी बसवली आणि कांही काळ ती ट्यूबच आमच्या आईची जीवनदायिनी झाली. स्टोव्हमध्ये फनेलनं रॉकेल भरावं तसं दूध, पाणी वा अन्य द्रवपदार्थ त्या ट्यूबमधून आईच्या पोटामध्ये भरवावे लागत. हे सगळं नर्सकडून करुन घेणं तिला अत्यंत संकोचास्पद नव्हे, लज्जास्पद वाटे. माझा भाऊ, मामा, दादा सर्वजण आईचं करत होतेच. (भावजय बाळंतपणासाठी माहेरी होती.) पण स्त्रीसुलभ संकोचानुसार आईला अवघड वाटे. म्हणून माझी बायको तब्बल सहा महिने मुंबई सोडून सांगलीत राहिली. आईवर माझ्या बायकोची आत्यंतिक श्रध्दा होती. आज माझी बायको मोठी सुगरण म्हणून प्रसिध्द आहे. कुकींग क्लासेस चालवते. आकाशवाणी, मासिकं, वृत्तपत्रं यामध्ये तिच्या मुलाखती येतात. पण आपण 'शून्य' असताना, आपली सगळी जडणघडण केवळ आपल्या सासुमुळे, म्हणजे माझ्या आईमुळे झालीय याचा तिला मोठा अभिमान आहे. आजसुध्दा एखादा पदार्थ चांगला बनवूनसुध्दा ती म्हणत असते, छे पण तुमच्या आईसारखी चव नाही. अशा माझ्या बायकोनं, सख्खी मुलगी काय करेल अशी मनोभावे आईची सेवा केली. मी महिन्यातून एकदा किंवा दोनदा मुंबईहून सांगलीत येत असे. माझा धाकटा भाऊ, मामा, मावशी आईची सेवा करत. पण तिच्या वेदना तिलाच सहन कराव्या लागत. बाभळीचे काटे आतून कुणीतरी एकसारखं टोचतंय अशी तिच्या घशाची अवस्था असे . भेटायला येणारी - जाणारी मंडळी आईला बघायला येत. अशा वेळी कांही हलकं फुलकं बोलावं की नाही ? नाही. ही मंडळी, कोण केव्हा गेलं ? कसं गेलं ? असं मरणाविषयीच बोलत. आम्ही घरची मंडळी गप्पांचा ओघ दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करत असू. अर्थात ती

(७४)