पण सगळे बेत मनातच राहिले.
अचानक आईला कॅन्सरने गाठले. पंचवीस वर्षापूर्वी कॅन्सरसंबंधात आजच्याइतकी प्रगत अवस्था नव्हती. टाटामधील डॉक्टरांनी मला बाजूला बोलावून सांगितलं. “ऑपरेशनच्या पलीकडची स्टेज आहे. त्यांना फार त्रास देण्यात अर्थ नाही. तुमच्या आग्रहापोटी ऑपरेशनला घेतलं तर कदाचित टेबलावरच......."
मी झटकन तोंड फिरवलं. कन्सल्टिंग रुमबाहेर बसलेल्या माझ्या आईला आणि माझ्या दादांना मी काय सांगू ? कसं सांगू ?
परिस्थिती माणसाला बरंच काही शिकवते. अभिनयाचा गंध नसतानासुध्दा मी उत्तम अभिनय वठवत म्हटलं.
"अग आई, डॉक्टर म्हणाले की ऑपरेशनची अजिबात गरज नाही. मी कांही औषधं आणि इंजेक्शनस देतो. त्यानं बरं वाटेल. "
आईच्या भाबड्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला बरं वाटलं. पण ते खोटं होतं. आईचा अभिनय 'अधिक' श्रेष्ठ होता. कारण तो अभिनय अधिक सात्विक होता. निर्मळ होता. आपल्या हळव्या मनाच्या नवऱ्याला आपल्या जीवघेण्या, दुर्धर रोगाची तीव्रता उमगू नये म्हणून केलेला तो अभिनय होता !
आणि असा अभिनय करण्याची गरज आईला वर्षभराच्या कॅन्सर बरोबरच्या झुंजीमध्ये अनेकदा पडली.
माझे दादा पहाटे साडेपाच वाजता उठत. स्वतः चहा करीत. आईबरोबर थोड्या गप्पा होत. आणि मग त्यांचे ज्ञानेश्वरी वाचन आणि बाकी नित्यकर्माना सुरुवात होई. आईच्या आजाराची तीव्रता वाढली तशा गप्पा बंद झाल्या. घशावाटे पोटात कांही अन्न जाण्याचा मार्ग जवळजवळ बंदच झाला होता. मात्र चहाचा घोट आई दादांबरोबर घेई. म्हणजे दादांना तसं वाटे. आई चहाचा घोट तसाच घशात ठेवी आणि हळूच वॉश बेसिनमध्ये चूळ टाकून देई !
आईला स्वत:चा कॅन्सर केव्हाच कळला होता. मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच. ते नंतर आम्हाला तिच्या एका कवितेतून कळलं ! आजच्यासारखी परिणामकारक पेनकिलर्स नसतानासुध्दा, होणाऱ्या मरणप्राय वेदना ती शांतपणे सहन करायची. पोटातून येणारे उमाळे कसेबसे गिळायची. 'पण 'गिळायची' असं तरी कसं म्हणायचं ? दैवाने, निष्ठूर दैवाने