पान:पुत्र सांगे.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
माझी आई

- अविनाश टिळक

(विपुलश्री मासिकाने आयोजलेल्या
'माझी आई' या विषयावरील स्पर्धेतील
पारितोषिक प्राप्त लेख ( संक्षिप्त स्वरुपात)

 सुमारे ५० वर्षापूर्वीची गोष्ट.

 आमच्या सांगलीमध्ये आमराईसमोरच्या मोठ्या मैदानावर एक भव्य औद्यागिक प्रदर्शन भरलं होतं. त्यात मनोरंजनाचे अनेक प्रकार होते. पण उभ्या चक्रावर आकाशात उंच जाणारा चक्री पाळणा हे सर्वाचं मोठं आकर्षण बनलं होतं. एक मध्यमवयीन महिला आपल्या दोन मुलांना घेऊन तिथं उभी होती. तिची जिवलग मैत्रीण आपल्या मुलांना घेऊन आली होती. सगळी मुलं, चक्राकार गतीने उंच-उंच जाणाऱ्या त्या पाळण्याकडे आणि त्यात बसलेल्या माणसांकडे विस्फारीत डोळ्यांनी पहात होती. एवढ्यात ती मध्यमवयीन स्त्री आपल्या दोन लहान मुलांजवळ आली. त्यांना एका बाजूला घेऊन हळूच म्हणाली, "हे बघा, माझ्याजवळ आता थोडेच पैसे उरलेत. सगळ्यांना काही मी त्या चक्रामध्ये बसवू शकत नाही. तुम्हाला विमलताईनं आग्रह केला तरी यायचं नाही. तुम्ही म्हणायचं की आम्हाला उंच पाळण्याची भीती वाटते. चक्कर येते. राहील ना नीट लक्षात. "

  ती स्त्री माझी आई होती.

 त्यावेळची तिची व्यथित नजर, व्याकूळ चेहरा आजही माझ्या स्मरणात आहे. दोन-चार रुपयांसाठी, आपल्या मुलांना, आपल्या लाडक्या मुलांना, हिरमुसलं करताना तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील?

 परिस्थिती कांही नेहमीच एकसारखी राहात नाही. माझ्या वडिलांच्या बरोबरीने काबाडकष्ट करुन, शिक्षिकेची नोकरी करुन तिनं आम्हाला वाढवलं. पुढे मला मुंबईला रिझर्व्ह बँकेत नोकरी लागली. धाकट्या भावाला स्टेट बँकेत नोकरी मिळाली. आता सुखात राहावे असे दिवस आले. कधी थोरल्या मुलाच्या ब्लॉकमध्ये मुंबईत तर कधी धाकट्या मुलाकडं सांगलीत. जरा हरिद्वार - ऋषिकेश अशी ट्रीप करावी. कन्याकुमारीला जाऊन स्वामी विवेकानंदाचे स्मारक बघावं असे बेत झाले.

(७२)