Jump to content

पान:पुत्र सांगे.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चांगली झाली. त्यांचे अनेक वृध्द स्नेही सोबती तिलांजलीला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना घरी येऊन आदरांजली वाहता आली. अनेक परिचितांना घरी येऊन, आठवणी सांगून, दादांविषयीचा आदर त्यांना व्यक्त करता आला. प्रत्येक दिवंशी अक्षरश: त्यांच्या चाहत्यांची रांग लागलेली असे. आपले वडिल किती थोर आहेत, हे भेटायला येणाऱ्या लोकांच्या बोलण्यावरुन आम्हाला कळायचं. सुप्रसिध्द क्रिकेटर विजय भोसले हा त्यांचा एके काळचा विद्यार्थी. एप्रिल ८५ मध्ये त्याचा सांगलीत गौरव सामना खेळला गेला. त्याला ७५ हजार रुपयांची थैली देण्यात आली. विकलांग झालेल्या दादांना तो आवर्जुन भेटायला आला. तो शिकत असतानाची दादांची विपन्नावस्था त्याला माहित होती. सारं आठवून त्याला भडभडून आलं. त्यानं चेकबुक काढलं. एका कोऱ्या चेकवर सही केली आणि दादांना म्हणाला 'सर, ह्यावर कांही आंकडा टाका. मी आता मोठा झालोय ते तुमच्या आशिर्वादाने. तेव्हा गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी घ्या' तेव्हां दादांना गहिवरुन आलं. ते म्हणाले “बाबू तू मोठा झालास आणि तरी आपल्या गुरुजनांना विसरला नाहीस ह्याचं मला कौतुक वाटतं. माझ्या सुदैवाने माझी दोन्ही मुले सुस्थितीत आहेत. मला कांही नको," भावनावेगाने त्यांना अधिक बोलवेना. दोघं गुरु-शिष्य हेलावून गेले होते.

 अशा एक ना अनेक आठवणी येणारे स्नेही - सोबती सांगत तेव्हा गहिवरुन येई. पन्नास पंचावन्न वर्षापूर्वीच्या काळात, कोणी पुढे होत नसता, एका हरिजनाच्या मृत्यूनंतर, त्याला खांदा द्यायला पुढे जाणारे दादा, खोकल्याची उबळ असह्य होत असतानाही नातवाला आनंदाने शिकविणारे दादा, आपल्या मुलांच्या लग्नांत आर्थिक अडचणीपोटी सुनांच्या अंगावर दोनचार तरी ठळक दागिने घालता यावेत म्हणून अत्यंत नाईलाजापोटी वरदक्षिणा घ्यावी लागली ती माझ्या तत्वाविरुध्द होती म्हणून माझ्या मृत्यूनंतर माझ्या शिलकीतून ती रक्कम दोन्ही व्याह्यांना परत करावी असे आवर्जुन आपल्या अखेरच्या इच्छापत्रात लिहिणारे दादा, आपल्या शिक्षक बांधवांना आर्थिक सुखसोयीचा लाभ व्हावा म्हणून शिक्षक पतपेढीच्या विकासासाठी झटणारे दादा, अशी एक ना अनेक रुपे आज मला त्यांची आठवत आहेत. डोंबिवलीच्या वास्तव्यात त्यांची फार बौध्दिक कुचंबणा व्हायची. सांगलीत मराठे सर आले की ज्ञानेश्वरी, गीता आणि गीतारहस्यावरील त्यांच्या चर्चां एवढ्या रंगायच्या की दोघांनाही तहान भुकेची आठवण सुध्दा व्हायची नाही !

(७०)