पान:पुत्र सांगे.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेवटपर्यंत विलक्षण माया होती. दाजीसाहेब करमरकरांच्या सराफी दुकानावरील अड्यापासून तो अगदी मेनरोडच्या आत्मारामाच्या सलूनमध्ये रंगणाऱ्या गप्पा, भेटणारी माणसं ह्यांचं वर्णन सांगण्यात ते अगदी रंगून जात. त्यातील पुष्कळशी माणसं मला केवळ नावानीच माहित असत. पण दादांनी त्या सर्वाविषयी इतकं कांही सांगितलेले होतं की दादांच्या निधनानंतर त्यातील कांही मंडळीना मी बिनचुक संदर्भ देऊन ओळखू शकलो ! त्यांचे हे प्रेम मृत्यूच्या अखेरच्या दिवसापर्यंत होतं. डोंबिवलींच्या डॉ. रावांच्या हॉस्पिटलमध्ये अर्धवट ग्लानीत सुध्दा "नाना आला कां ? दक्षिण महाराष्ट्र आला कां ?" असे ते विचारत. देहाने डोंबिवलीत राहिले तरी मनाने ते सतत सांगलीतच असत.

 "दक्षिण महाराष्ट्र" व दादा हे एक अतूट असे जिव्हाळाचे नाते होते. दादांमध्ये सुप्त लेखनशक्ति होती पण तिला प्रेरणा देऊन कार्यान्वित करण्याची किमया दै. महाराष्ट्राचे संपादक श्री. बापुसाहेब बिनीवाले यांची. त्यांचा प्रेमळ, आग्रही धोशा सतत मागे असल्यामुळे दादा अनेक उत्तमोत्तम लेख, अग्रलेख लिहू शकले. अखेरच्या दिवसांत डॉक्टरांनी मनाई केली म्हणून त्यांचे वाचन जवळ जवळ बंद झाले होते, पण वेळोवेळी संपादक नसतानासुध्दा ते द. महाराष्ट्रासाठी लिहित असत. त्यांचा अखेरचा स्त्रीमुक्ती विषयीचा लेख त्यांच्या मृत्यूनंतर द. महाराष्ट्रात प्रसिध्द झालेला आहे. त्यांच्या लेखनामुळे द. महाराष्ट्राला प्रतिष्ठा प्राप्त झाली असे श्री. बापूसाहेब बिनीवाले ह्यांनी दादांवरच्या मृत्युलेखात कृतज्ञतेने नमूद केले आहे. पण त्याबरोबरच हेही तितकेच खरे आहे की, द. महाराष्ट्राचे संपादक म्हणून दादानाही तितकीच प्रतिष्ठा प्राप्त झाली कारण मुंबई दूरदर्शन तसेच प्रमुख वृत्तपत्रांनी त्यांच्या निधनानंतर द. महाराष्ट्राचे माजी संपादक असाच दादांचा उल्लेख बातम्यांमध्ये केला आहे.

 दादांनी देह डोंबिवलीत निरुपायाने ठेवला. खरं म्हणजे जिथं त्यांनी उभं आयुष्य घालविलं, जिथं त्यांचं कर्तृत्व फुलून आलं, निढळाच्या घामानं बांधलेल्या ज्या वास्तूत त्यांच्या प्रिय पत्नीचा अंत झाला, त्या प्रिय सांगलीत आपली जीवन समाप्ती झालेली त्यांना आवडली असती ! पण ह्या संबंधात आमचा सर्वस्वी निरुपाय होता. आम्ही चाकरमानी माणसं. भाकरीसाठी सांगलीला दुरावलेली. म्हणून त्यांचा मृत्यू जरी डोंबिवलीत झाला असला तरी हेतूपूर्वक आम्ही त्यांचे दिवस त्यांच्या आवडत्या तपोभूमीत, सांगलीतच केले आणि ही गोष्ट अतिशय

(६९)