पान:पुत्र सांगे.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जरा बरा असतो तर तुमच्या बरोबर आलो असतो, हिमालय धुंडाळायला. पण त्या बोलण्यांतील वैयर्थ जाणवून आमचे आम्हालाच वाईट वाटत असे.

 १९८३ च्या जूनमध्ये त्यांना पहिल्यांदाच मोठा आजार झाला. पांच-सहा दिवस सतत उचकी लागली. प्रोस्टेट ग्लँडसचा त्रास वाढला. छातीतील बरगड्यांमध्ये न्यूमोनियाचा पॅच तयार झाला. कै. आईच्या निधनानंतर त्यांनी जाणून बुजून जेवणखाण कमी केलेले. त्यामुळे जो अशक्तपणा आला होता तो पहाता प्रोस्टेटसाठी किंवा न्यूमोनियाचा पॅच काढण्यासाठी ऑपरेशन करणे त्यांच्या प्रकृतीला झेपण्यासारखे नव्हते. अशा वेळी माझ्या धाकट्या भावाचे प्रमोशन आले. दादांची तशी स्थिती बघून त्याची प्रमोशन घ्यावे किंवा कसे याबद्दल मनाची चुळबूळ चालली होती. त्या वेळी दादांनी त्याला जोरात ठणकावले. “आम्ही पिकली पानं. आमच्या बेड्या तू किती दिवस अडकवून घेणार ? तू तुझे करीअर संभाळ. बेलाशक ब्रह्मपुरीचे पोस्टींग घे."

 त्यानंतर म्हणजे चि. रविचे बिन्हाड हलल्यानंतर त्यांना सांगली सोडून माझ्याकडे डोंबिवलीला यावे लागले. सांगली सोडणे हा त्यांच्यावर मोठाच आघात होता. सांगली आणि सांगलीची माणसं हा त्यांचा प्राण होता. अंगात उमेद असेतो ते सकाळी मित्रांसमवेत सांगलवाडीच्या दत्तमंदिरापर्यंन्त फिरुन येत. मग नगरवाचनालयात जाऊन येत. सर्व पेपर्स, मासिकं, त्यांच्या आवडीचा इलेस्टेटेड विकली वाचत. घरी आणत. याबाबत नगरवाचनालयाच्या सेवकांपासून, पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचेच त्यांना मनःपूर्वक सहकार्य असे. कधी कधी त्यांच्यासाठी नियमहि बाजूला ठेवले जात. याला कारणीभूत होती दादांची नगरवाचनालयावरील असीम निष्ठा. या संस्थेचे सेक्रेटरी किंवा अध्यक्ष असताना संस्थेसाठी श्रमलेच पण पदाधिकारी नसतानासुध्दा संस्थेसाठी ते झटत असत. फार कशाला, प्रकृती अगदी अस्थिपंजर झालेली आहे, अशा अवस्थेतसुध्दा १९८४ च्या एप्रिलमध्ये ते महाबळेश्वरला इतर पदाधिकाऱ्यांबरोबर, त्या वेळेचे मुख्यमंत्री व एकेकाळचे त्यांचे विद्यार्थी माननीय वसंतदादा पाटील ह्यांना, संस्थेला अधिक अर्थसहाय्य हवं होतं म्हणून भेटायला गेले होते. श्री. वसंतदादासुध्दा त्यावेळी दादांची प्रकृती पाहून हेलावून गेले. “गुरुजी प्रकृतीची काळजी घ्या" असे त्यांनी आवर्जुन सांगितले.

 सांगली व सांगलीची माणसं, तिथल्या संस्था या सर्वावरच त्यांची

(६८)