पान:पुत्र सांगे.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुलांना नव्हती. जणुं कांही आमच्या घरात आम्हीच जावई झालो होतो !

 अलीकडच्या ४-६ महिन्यात दादांनी मृत्यूचा जणुं कांही ध्यासच घेतला होता, विशेषत: माझ्या धाकट्या भावाचा संसार ब्रम्हपूरीला जाऊन पाहून आल्यानंतर ! माझा धाकटा भाऊ (चि. रविंद्र) जन्मला तेव्हा अवघा पावणेतीन पौंडाचा होता. मृत्यू त्याच्या भोवती नुसता घोंघावत होता. पण आई-दादांनी सतत दोन-तीन वर्षे रात्रीचा दिवस करुन त्याला जगविले. असा मुलगा मोठा झाला. स्टेट बँकेत अधिकारी झाला. आई-दादा, मामा-मावशी ह्यांच्या उबदार मायेच्या पांघरुणाखालून जाऊन ब्रह्मपुरीला (जि.चंद्रपूर) स्टेट बँकेचा जबाबदार अधिकारी म्हणून काम करु लागला. ह्या अशा 'बाळाचा' संसार दादानी मार्च ८५ मध्ये स्वत: जाऊन बघितला. त्याने जोडलेली जिवा-भावाची माणसे बघितली तेव्हां दादा धन्य झाले. कै. आईच्या माघारी या अफाट विश्वाच्या पसाऱ्यात आपली दोन्ही मुले व्यवस्थित 'रांगायला' लागलीत हे पाहुनच कदाचित त्यांना आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता पटली असावी. कारण ब्रह्मपुरीला जाऊन आल्यापासून त्यांनी मृत्यूची जणू कांही आराधनाच आरंभली होती. आम्हाला वाईट वाटेल म्हणून तसे ते बोलून दाखवत नसत. आपण पूर्णपणे परावलंबी होण्याच्या आत आपल्याला मृत्यु यावा अशी त्यांची इच्छा होती. त्या दृष्टीने ते खरोखर 'इच्छामरणी' ठरले !

 वास्तविक आमचे दादा अतिशय काटक. त्यांना कंटाळलेले, थकलेले असे आम्ही कधीच बघितले नाही. डोंगर दऱ्यातून भटकण्याची आणि निसर्गसौंदर्य डोळे भरुन पाहण्याची त्यांना अतिशय आवड, आयुष्यात मुलांसाठी पैसा अडका मिळविला नाही अशी खंत ते एकदा बोलून दाखवत होते तेव्हां माझा धाकटा भाऊ रवी उत्स्फुर्तपणे म्हणाला, “दादा ते कां ? तुम्ही तर आम्हाला माथेरान - महाबळेश्वर दिले आहेत" पै-पैसा व्याजी लावण्यापेक्षा प्रवासात कारणी लावावा. निसर्गाची दालनं धुंडाळावीत ह्याची आवड आम्हाला त्यांनी लावली. दोन वर्षापूर्वी मी आणि माझी पत्नी सुमन युथ हॉस्टेलच्या कुलुमनाली ट्रेकला गेलो होतो. त्यासंबंधीचा आमचा लेख 'सांज तरुण भारत' च्या दिवाळी पुरवणीत प्रसिध्द झाला होता. अलीकडच्या आजारपणाच्या काळात सुमनकडून तो लेख दादा सारखा वाचून घेत. शारिरीक व्याधीनी जर्जर झालेल्या त्यांच्या चेहऱ्यावर अशा वेळी निरागस हास्य चमके उत्साहात येऊन म्हणत.

(६७)