पान:पुत्र सांगे.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आमचे दादा

(दादांच्या निधनानंतर त्यांच्या मासिक श्राध्दानिमित्त "दक्षिण महाराष्ट्र" या साप्ताहिकात लिहिलेला लेख. सदर लेख दादांच्या कांही वेगळ्या आठवणी आणि 'स्वभाव-विशेष दर्शवितो म्हणून मुद्दाम समाविष्ट केला आहे.)

-----

 दादा गेले | अखेर दादा गेले || हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कॉटशेजारी बसलेले असतांना शेवटच्या चार-पाच दिवसांतील त्यांची तडफड, जीवाची घालमेल, अस्वस्थता पाहून वाटायचं की परमेश्वरानं त्यांना सोडवावं, हो, आम्हांला ते कितीही हवेसे असले तरी. त्यांच्या हाल-अपेष्टा होऊ देऊ नयेत आणि खरंच, आमच्या मनांत यायला आणि ईश्वरानं आमचं ऐकायला एकच गांठ पडली !

 वास्तविक दादा केव्हांच जायचे. आमची कै. आई (कै. सौ. इंदुमती टिळक) १९७४ च्या सप्टेंबरात कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने गेली. तेव्हांच दादा जायचे. कारण आमच्या आईवर त्यांनी निरतिशय प्रेम केलं. लहानपणीच मातृछत्र गमावलेल्या आमच्या दादांना आमची आई म्हणजे संस्कृतात वर्णन केलेली त्वमेव माता, पिता त्वमेव, सखी, भार्यां, सचिव अशी सर्व कांही होती. आयुष्याच्या संपन्न स्थितीत, चार दिवस सुखासमाधानानें घालवायची स्वप्नं पाहात असतानाच मध्येच आमची आई निघून गेली. हा धक्का आमच्या दादांना प्राणांतिक होता. तेव्हा त्याच वेळी आईच्या पाठोपाठ दादा जायचे, पण कै. आईच्या माघारी जवळ जवळ ११ वर्षे त्यांना जगविण्याचे, आनंदाने जगविण्याचे खरे श्रेय त्यांच्या दोन्ही सुनांना, सौ. सुमन व चारु यांना आहे, विशेषतः सौ. चारुला. स्त्री ही जन्मजात माता असते हे ह्या दोघींच्याकडे बघितलं की अधिक पटतं ! खरोखर मातेच्या ममतेने त्या दोघीनी दादांचे केलं. किंबहुना जगण्यात, आईच्या माघारी जगण्यात खरोखरीच कांही प्रयोजन आहे, ह्याची जाणीव त्यांनी दादांना करुन दिली. पुष्कळ लोकांना, विशेषतः बाहेरच्या लोकांना ह्या त्यांच्या सूना आहेत, हे पटतच नसे इतके त्यांचे संबंध बापलेकीसारखे जिव्हाळ्याचे होते. दादांचे कागदपत्र, बँकबुक इत्यादीची त्यांना जेवढी इत्थंभूत माहिती होती तितकी आम्हां दोन्ही

(६६)