त्यांचा इतिहास, कार्यपध्दती, त्यांचे वाङमय ह्याविषयी विलक्षण आकर्षण असे. तशाच स्वरुपाचे आकर्षण दादांच्या मनात असे. इंग्रजी भाषा आणि त्यातील वाङमयाची दादांना फार ओढ होती. त्या भाषेच्या अभ्यासाचा त्यांना अखेर पर्यंत एवढा छंद होता की, आपण जितक्या आनंदाने कथा-कादंबऱ्या वाचतो तेवढ्याच आनंदाने ते इंग्रजी व्याकरणाची पुस्तके वाचत ! त्यांच्या निधनानंतर त्यांच्या संग्रहात २५-३० तरी पुस्तके निव्वळ इंग्रजी ग्रामरची आढळली. शेक्सपिअरचे त्यांना इतके आकर्षण होते की, जेथून मिळतील तितकी आणि जेव्हा मिळेल तेव्हा ते शेक्सपिअरविषयीची पुस्तके वाचून काढत. पुढे पुढे डोळ्याची शक्ती कमी झाली म्हणून नाहीतर पी.एच.डी.साठी त्यांना शेक्सपिअर व त्यांच्या नायिका ह्या विषयासाठी खूप वाचन करावयाचे होते. ते अखेर राहिलेच ! अशा त्यांच्या किती आठवणी सांगायच्या ?
अशा माझ्या इंग्रज सासऱ्याचे प्रथम पुण्यतिथीनिमित्त सादर स्मरण!