पान:पुत्र सांगे.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमच्या दादांना आणि आपल्या घरात त्यांनी निर्माण केलेल्या मोकळ्या वातावरणाला होते. सकाळी शेगडीवर चहा करायचा; गॅस असला तरी बरोबर बिस्किटे वा ब्रेड टोस्ट, हातात वर्तमानपत्र हवंच. मग त्यातील बातम्यानुसार सर्वांच्या चर्चा. त्यावर प्रत्येकाची मल्लीनाथी. असं आमच्या सांगलीच्या घरचं वातावरण असे. सांगलीत थंडी असून असून किती असणार ? पण आमच्या दादांच्या हातात नेहमी हातमोजे, पायात पायमोजे. जसा कांही सारा जन्म इंग्लंडमध्ये गेलाय ! बोलताना नात्यातील माणसांपेक्षा टेनिसन, शेक्सपीअर, रॉबर्ट ब्राउनिंग, मिल्टन, चर्चिल, जेन ऑस्टिन ह्यांचे उल्लेख सतत. माझी ह्या मंडळींशी थोडी-फार ओळख एरवी कशाला झाली असती ? रात्री दादांचा आवडता छंद म्हणजे बी.बी.सी ऐकणे, आणि तो सुध्दा मोठ्या व्हाल्यूममध्ये ! त्यांचे दोन ट्रॅन्झिस्टर्स असत. एक खराब झाला की दुसरा तयार पाहिजे. बी. बी. सी. श्रवणात खंड पडलेला त्यांना सहन होत नसे. त्यांच्या शेवटच्या आजाराच्या दिवसात मला वाटे की, बी.बी.सी. ऐकण्याने त्यांची झोप उडत असेल. पण तसे होत नव्हते. ते म्हणायचे की, माझ्या रात्रीच्या साऱ्या वेदना मी. बी. बी. सी. मुळेच विसरतो. बी.बी.सी. वरील बातम्या, नाटके ऐकता ऐकता अंगावर ट्रॅन्झिस्टर पडलेला आहे आणि दादा गाढ झोपले आहेत, असे दृश्य कितीदा तरी दिसायचे !

 दादा मूळचे प्राथमिक शिक्षक. अशा पेशाच्या माणसामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन रहावे अशी कल्पना तरी मनात येईल कां ? पण आमचे दादा म्हणजे एकदम युरोपीयन ! लग्न होण्याच्या आधीच्या काळापासून म्हणजे सुमारे १९२९ पासून दर मे महिन्यात ते महाबळेश्वरला जात. अकरा महिने भरपूर काम करावे; आणि एक महिना हिलस्टेशनला जाऊन आराम करावा अशी वृत्ती. महाबळेश्वरच्या “आराम” हॉटेलचे मालक रानडे याबाबतीत दादांना संपूर्ण सहकार्य देत. त्यापूर्वीचे आराम हॉटेलचे मालक धोंडोपंत साठे ह्यांचे तर दादांचेवर फारच प्रेम. दादांना जे कांही परवडेल ते दादा देत आणि कोणताही हिशेब मनात न ठेवता ते दादांना आल्या दिवसापासून ते पुन्हा शाळा उघडण्याच्या आदल्या दिवशी अखेरपर्यंत ठेवून घेत. स्वतःच्या पंक्तिला जेवायला घेऊन बसत. पुढे प्रापंचिक जबाबदाऱ्या वाढल्यानंतर दादांच्या महाबळेश्वरच्या फेऱ्या कमी झाल्या. पण मूळ वृत्ती अखेर पर्यंत कायम होती. इंग्रजी राजवटीच्या प्रारंभीच्या काळातील पहिल्या पिढीला इंग्रज लोक,

(६४)