पान:पुत्र सांगे.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
माझे 'युरोपियन' सासरे

 (आमच्या साप्ताहिकाचे एक माजी संपादक कै. रा.वा. टिळक यांचा पहिला वर्षश्राध्ददिन त्यांच्या कुटुंबीय मंडळींनी नुकताच साजरा केला. कै. टिळक हे सांगली नगर वाचनालयाचे पदाधिकारी या नात्याने त्या संस्थेशी अनेक वर्षे संबंधित होते. तेथील सेवकांना अन्य सेवकांप्रमाणे शासकीय वेतनश्रेणी मिळावी, त्यांचे जीवनमान सुधारावे असे त्यांना वाटत असे. ती त्यांची इच्छा जाणून त्यांचे दोन चिरंजीव श्री. अविनाश (रिझर्व बँक अधिकारी मुंबई) आणि श्री. रविंद्र (स्टेट बँकेतील अधिकारी, ब्रह्मपुरी) यांनी संस्थेतील १५ सेवकांना प्रत्येकी रु. १०१ देऊन वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सत्कृत्य केले. याच निमित्ताने त्यांची ज्येष्ठ सून सौ. सुमन अविनाश टिळक (डोंबिवली) यांनी लिहिलेला त्यांना आपले श्वशुर कसे दिसले आणि वाटले या संबंधीचा भावपूर्ण लेख आम्ही येथे देत आहोत. आम्हीही आमचे सहकारी कै. टिळक यांचे स्मरण करुन त्यांच्या स्मृतीला अभिवादन करीत आहोत.)

-संपादक

 सासरे आणि युरोपियन ? चमत्कारिक वाटतं ना ? भारतीय संस्कृती आणि परंपरा ह्या विषयी विलक्षण आदर असणारे, रोज पहाटे न चुकता ज्ञानेश्वरीची पारायणं करणारे आमचे दादा वृत्तीने मात्र युरोपियन होते. देवपूजा, व्रत वैकल्य अशासारख्या धर्मकांडांत ते कधीच अडकून पडले नाहीत. युरोपियन लोकांसारखा प्रत्यक्ष कर्मावर त्यांचा अधिक विश्वास होता. दादांचा ज्नम १९१० सालचा. अशा जुन्या जमान्यातील असूनसुध्दा पारंपारिक पध्दतीने जीवन न घालविता युरोपियन लोकांसारखी आयुष्याकडे अत्यंत खेळकर वृत्तीने पाहण्याची व विविध तऱ्हेने जीवनाचा आस्वाद घेत जगण्याची वृत्ती त्यांनी अंगी बाणवली होती.

 टिळकांच्या घरात मी सून म्हणून आले पण पहिल्या दिवसापासून कन्या म्हणूनच वावरले ! माहेरच्या रुळावरुन सासरच्या रुळावर आयुष्याची गाडी जायची म्हणजे एरव्ही किती खडखडाट होतो ? पण टिळकांच्या घरात मात्र एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जावं इतक्या सहजपणे मी आले, याचे संपूर्ण श्रेय

(६३)