पान:पुत्र सांगे.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुढारी, बडी धेंडे, दाब देणारे दादा लोक, गुंड बाळगणारे पुंड, केवळ डोळ्यांच्या इषाऱ्यावर दंगली घडवून आणणारे मातबर संभावित गळेकापू यांचे दिवस आता संपत आले आहेत. दुर्जनांची हकालपट्टी होण्याची वेळ जवळ येत चालली आहे. जनता जनार्दनाचे नरसिंह रुप लवकरच प्रकट होणार आहे. पुढारी लोकहो, सावधान ! नेते मंडळींनो, हुश्शार, तुमची सद्दी संपत चालली आहे. तुमचे दिवस भरत येत आहेत. अजुन डोळे उघडा नाहीतर अग्रभू क्रांतीच्या तांबड्या लाल रक्तात तुम्ही न्हाऊन निघणार आहात.

 पुढारी मंडळीतील सर्वात श्रेष्ठतम उच्चभ्रू व्यक्ति म्हणजे मंत्री. नेहरु, शास्त्री, देशमुख, किडवाई, त्यागी आदि अपवादात्मक विभूति. त्यांनी मंत्रीपदाची महती वाढविली, दर्जा उंचावला, रुबाब राखला, शान शौभिवंत केली. पण हाताच्या बोटावर मोजता येणारे हे आदर्श नरशार्दूल सोडले तर आजकालचे मंत्री म्हणजे भ्रष्टतेचे, चारित्र्यहीनतेचे लांछनास्पद अपप्रवृत्तींचे जिवंत राक्षस. यांच्या एकएक कृति अंगावर शहारे आणतात. संपत्ति, द्रव्य, पैसा यांच्या लोभास्तव माणूस किती खालच्या पातळीला जातो याचे इरसाल नमुने पहावयाचे असतील तर या मंत्र्यांची चरित्रे व चारित्र्ये यांचे सूक्ष्म अवलोकन करावे. ते केल्यानंतर कोणाही सहृद्य माणसाला वाटेल की देवा मला कोणत्याही योनीत जन्म दे पण मंत्र्यांची अवलाद बनवू नकोस. यानी मिळविलेल्या संपत्तीची गणना प्रत्यक्ष चित्रगुप्ताला करणेसुध्दा जिकीरीचे होईल. भारतातील साऱ्या मंत्र्याच्या ज्ञात व अज्ञात संपत्तीची, नातेवाईकांच्या, बायकापोरांच्या नावावर जमा केलेल्या पैशाची मोजदाद केली तर पाचच काय पण दहा पंचवार्षिक योजना विनाआयास, जनतेवर कर न लादता, सरकारी तिजोरी मोकळी न करता फलद्रुप होतील. पण हे अवघड कार्य कोण सिध्दीस नेणार ? सापाच्या बिळात बळेच कोण हात घालणार ? पिसाळलेल्या कुत्र्याचा कोण पाठलाग करणार ? जाणूनबुजून मृत्यूला कोण कवटाळणार ?

 या मंत्र्यांचा पूर्वेतिहास मोठा अभ्यासनीय आहे. कोणी भूमिहीन शेतकऱ्यांच्या कुळात जन्मलेले आहेत कोणी शाळा मास्तर, कारकून मजूर, किरकोळ व्यापारी यांच्या वेशात अवतीर्ण झाले आहेत. पण पुढे यांनी देशभक्तीचा व्यवसाय सुरु केला. तोंडात अमृताच्या चुळा व हृदयात विषाचे फवारे बाळगून त्यानी हा धंदा पराकाष्टेच्या उन्नतावस्थेत नेऊन सोडला. आपली

(५७)