Jump to content

पान:पुत्र सांगे.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिळविली याचे संशोधन करण्याकरिता एक आयोग नेमावा. त्याचा अहवाल प्रसिध्द करावा. तो कार्यवाहीत आणला नाही तरी चिंता नाही. पण त्याच्या प्रसिध्दीने तरुण मंडळी खडबडून जागी होतील. देशात एक अभूतपूर्व क्रांती होईल. पुढारीपणाचे बुरखे पांघरलेल्या नीच लोकांची कारस्थाने जगजाहीर होतील. देश एका सर्वभक्षक पेंढारी टोळीपासून मुक्त होईल. खरा समाजवाद प्रस्थापित होईल. गरीब अमीर होतील. आदिवासींचा वनवास संपेल. गिरीजन खरे नागरिक बनतील.हरिजन उजळ माथ्याने स्पृश्य समाजात मानाचे स्थान भूषवितील. जातीयवाद नष्ट होईल. हिंदूमुसलमानांच्या दंग्याला पूर्णविराम मिळेल. धंदेवाईक स्मगलर्स, काळाबाजारवाले, लाचखाऊ अधिकारी, भ्रष्ट पोलिसवर्ग यांचा नायनाट होईल. वर्गकलह थांबतील. देशात चित्तथरारक परिवर्तन घडून येईल. आजपर्यंतच्या आपल्या सर्व प्रकारच्या अवनतीचे मूळ या ढोंगी पुढाऱ्यांच्या सैतानी अपकृत्यात आहे हे कटु सत्य साऱ्या भारतवासीयांना अवगत होईल.

 पण या समाजद्रोही नेत्यांचे पराक्रम शब्दबध्द झाले नसले तरी त्यांच्या मतलंबी चाळ्यांचा गुंजारव साऱ्या देशभर घुमत आहे. कोणी रक्त कसे पचवले, कोणी दरवडे केव्हा व कसे घातले, कोणी सहकारी पतपेढ्या, बँका व भांडारे यांची दिवाळे कशी काढली, कोणी निवडणूकी जिंकण्याकरिता काय लटपटी, खटपटी व वटवटी केल्या यांची कुजबूज गावागावातून, शहरोशहरी, राज्या- राज्यात निनादत आहेत. ऑन मनीची अफलातून किमया काय उलथापालथी करते याची रोमांचकारी हकीगत बहुजनांच्या मुखातून शब्दरुप घेऊन प्रचंड प्रपाताप्रमाणे उदंड उद्घोष करीत आहे. निवडणूकीच्या प्रचारासाठी पैशांच्या थैल्या मोकळ्या सोडणाऱ्या साखरसम्राटांची काळी कृत्ये उज्वल प्रकाशात चमकू लागली आहेत. पुंजीपतीनी कोणत्या आमिषाला बळी पडून विशिष्ट पक्षाची पोटभरणी कशी पोटतिडीकीने केली याचा सुगावा जनतेच्या कानी जाऊ लागला आहे. भोळी जनता, पोटाची खळगी भरण्याकरिता नाइलाजाने हुकमी मतांची भीक घालणारे दरिद्री, अन्नाला मोताद झालेले श्रमिक, पैशाच्या मोहाला लालचावलेले भाडोत्री विचारवंत यांना या नेत्यांनी कसे बनवले याची करुण कहाणी सर्वतोमुखी होऊ लागली आहे. याचा सम्यक परिणाम म्हणजे खालचा पीडलेला, नाडलेला, दबलेला वर्ग चवताळून खवळून संतापून रक्तमय क्रांतीचा मार्ग नाइलाजाने अगतिक होऊन निर्वाणीचा उपाय म्हणून अनुसरणार आहे. नेते,

(५६)