प्रगती करुन देशाचा विकास त्यांनी केला असता तर हे प्रांत:स्मरणीय झाले असते. पण मदिरा मदिराक्षी व मत्ता यांनी उन्मत होऊन ते देशद्रोही झाले. भाषा गरिबांच्या कळवळ्याची पण वागणूक त्यांच्या नरडीचा घोट घेण्याची. यांची मुले यांच्याहून सवाई, भारताचा आजचा इतिहास म्हणजे हे मंत्री त्यांची पोरेबाळे, त्यांचे सगेसोयरे यांची प्रकरणे, लफडी व कारस्थाने यांनी लडबडलेल्या सुरस घटनांची चमत्कृतीपूर्ण नोंद. राजेशाही गेली आणि यांची सुलतानशाही सुरु झाली. यांनी पैसा केव्हा कसा किती मिळविला याचा शोध लागणे अति बिकट काम आहे. समजा एखाद्या मंत्र्याला उपरती होऊन त्याने आपण अमाप संपत्ती कशी मिळविली, आज ती कुठे कोणत्या स्वरुपात किती तऱ्हेने अस्तित्वात आहे, याचे वास्तव वर्णन केले तर ते कथा, कादंबरी वा काव्य यांच्याहून अधिक मनोरंजक होईल. अशा मंत्र्याला त्याच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून ही सर्व संपत्ती कायदेशीररीत्या बहाल करावी. नोबेल प्राईझसारखे एखादे पारितोषिक त्याला सन्मानपूर्वक प्रदान करावे. पण हे कसे शक्य आहे ? मंत्र्यांना अशी सुबुध्दि सुचली तर देशाचा उदयकाल समीप आला असे मानण्यास हरकत नाही.
काही का असेना, पुढारी व त्यांचा पैसा हा विषय मोठा गहन मनोरंजक व विचारप्रवर्तक आहे. या विषयावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविण्याचा अभ्यासू संशोधक व जिज्ञासू विद्यार्थ्यांनी अवश्य प्रयत्न करावा. त्यांना विलोभनीय पदवी मिळेल व या पैशाच्या उत्पत्तीवर योग्य प्रकाश त्यांनी पाडला तर देशाच्या भावी इतिहासाला क्रांतीकारक कलाटणी लाभेल.
पुढारी पैसे कसे मिळवितात हे भले मोठे प्रश्नचिन्ह आहे. विस्मयजनक उद्गारचिन्ह आहे. याला पूर्णविराम केंव्हा मिळेल ?