पान:पुत्र सांगे.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काळजी देशहिताची. राष्ट्राला स्वातंत्र्य कसे मिळेल या काळजीने ते झुरणीला लागत असत. त्या तेजस्वी नेत्यांची परंपरा स्वराज्यप्राप्ती बरोबर विलयास गेली. जे कोणी जीव धरुन होते ते सांधीकोपऱ्यात जाऊन बसले. कांही सर्वोदयवादी बनले. जीवन कलहात ते अयशस्वी ठरले. त्यांना कोणी विचारीत नाहीसे झाले. त्यांच्या त्यागाचे मूल्य शून्य ठरले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समाधी बांधण्यात आल्या. स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. पण जिवंतपणी त्यांना अपमानाचे निकृष्ट जीवन जगावे लागले. मेल्यानंतर त्यांची स्तुतिस्तोत्रे व पोवाडे गाण्याचा धंदा सुरु करण्यात आला.

 अशा या स्वराज्यकालीन पुढाऱ्यांच्या लीला आहेत. पण सर्वात नवलाची गोष्ट म्हणजे या तथाकथित नेत्यांजवळ पैसा कसा येतो, कष्ट न करता, शरीर न झिजवता, भांडवल न घालता हे अमाप संपत्तीचे भागीदार कसे होतात ? नदीचे मूळ शोधू नये कारण ते सापडणे अशक्य असते. पण आजकाल भूगोल संशोधकांनी ते शोधण्याचा यशस्वी यत्न केला आहे. ऋषीचे कूळ हुडकून काढण्याचा अव्यापारेषु व्यापार अतिशहाण्या छिद्रान्वेषी पुरोगामी इतिहास भंजकानी केला आहे. पण या लब्धप्रतिष्ठित, स्वयंभू पुढाऱ्यांच्या घरी लक्ष्मी कशी आली याचा शोध लावण्याचा प्रयत्न कोणी जिज्ञासू राष्ट्रभक्तांनी केला नाही. तो प्रयत्न केला तर स्वराज्याचे सुराज्य करण्यास आपण का अयशस्वी झालो याचा साद्यंत इतिहास कळेल. चारित्र्यभ्रष्टता किती पराकोटीच्या थराला जाऊन पोहोचली आहे याचा बोध सामान्य जनतेला होईल. पाच पंचवार्षिक योजना कशा मातीमोल ठरल्या याचा उलगडा तरुण मंडळींना होईल. सहकारी संस्था, साखर कारखाने, सरकारी उद्योगधंदे, लोकोपयोगी प्रकल्प यांच्या कार्यात घोटाळे का माजतात, गोंधळ का उडतो, अंदाधुंदी धांगडधिंगा का घालते याचा उद्बोधक इतिहास जनतेला कळेल. नालायक पुढाऱ्यांच्या हाती देशाचा राज्यकारभार गेला म्हणजे समाज कसा अधोगतीला जातो याचे विदारक चित्र भावी पिढीला पहावयास मिळेल.

 आपल्या देशात परिस्थितीची पहाणी करण्याकरिता अनेक आयोग नेमले जातात. त्यांचे अहवाल धूळ खात पडतात. त्यांनी परिश्रमपूर्वक कांही सत्य गोष्टी उजेडात आणल्या तर त्या हेतुपूर्वक अंधारात लोटल्या जातात. पण प्रयोग म्हणून या पुढारी मंडळीनी सत्ता, संपत्ती व मानसन्मान कोणत्या अमानुष पध्दतीने

(५५)