पान:पुत्र सांगे.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुढारी आणि पैसा

 परवा एक स्विडीश पत्रकार भारतयात्रा करुन गेले. भारता संबंधी तुम्हास काय वाटते, असे एका वार्ताहराने त्यांना विचारले. या प्रश्नाचे त्यांनी मोठे मिस्किल व मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले, "भारत हा एक भल्या मोठ्या प्रश्नचिन्हांचा देश आहे !" थोड्या वेचक सूत्रमय शब्दात भारतावर ही केवढी मोठी सूचक पण खोचक टीका आहे. या शतकात शास्त्रज्ञांनी सृष्टीची अनेक रहस्ये उलगडून दाखविली. विविध शोध लावले. पण वैज्ञानिकांची मति कुंठित करील असे एक आश्चर्य भारतात आहे. स्वराज्य मिळाल्यापासून या देशात एक नवीन जात निर्माण झाली आहे. या जातीच्या हातात आज देशाचा राज्यकारभार केंद्रीत झाला आहे. जातीभेद नष्ट होतील, पण ही जात नामशेष होणे कदापी शक्य नाही. भारताच्या पंचवार्षिक योजना अयशस्वी होतात याचे कारण ही पुढाऱ्यांची जात.

 साखरेचा गोड गोंधळ घालणारे हेच पुढारी. जनता पक्ष घडविणारे हेच बुद्रुक. त्या पक्षाचे वाटोळे करणारे हेच धुरंधर देशाची अर्थव्यवस्था धुळीस नेणारे हेच चांडाळ. भांडवलदारांकडून निवडणुकीच्या वेळी अमाप पैसा उकळणारे हेच दरोडेखोर. मजुरांना संप करावयास लावणारे व त्यांच्या जीवावर अत्तराचे दिवे जाळणारे हेच बदमाश बाजीराव. संजयच्या पुंडाईला प्रोत्साहन देऊन देशात बेदिली माजविणारे हेच विश्वासघातकी. राजीवला तरुणांचा पुढारी बनविण्याचे कारस्थान रचून त्याच्या नावावर देशाची लूट करण्याचे मनसुबे बांधणारे हेच ते होळीचे होळकर !

 स्वातंत्र्य पूर्वकाळात पुढारी होते. त्यांनी देशाकरिता अक्षरशः घरादारावर निखारे ठेविले. साऱ्यांचे संसार सुखी व्हावे म्हणून स्वतःच्या संसारावर पाणी सोडले. प्रसंगी देहाची कुरवंडी केली. कफल्लक बनले. वडिलार्जित संपत्ती देशाच्या हितार्थ वेचली. ते खरे देशभक्त होते. स्वार्थ त्यांना माहित नव्हता. शून्यातून इमले कसे बांधावे याचे त्यांना ज्ञान नव्हते. लोकांच्या पैशातून साखर कारखाने काढून देशाच्या राज्यकारभाराची सूत्रे आपण, आपले सगेसोयरे, इष्टमित्र व भाऊबंद यांच्या हाती कशी राहतील याची चिंता करणारे ते चिंतामणी नव्हते. त्यांना एकच

(५४)