Jump to content

पान:पुत्र सांगे.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्रियांच्या अवयवांचा सुसंस्कृत पुरुष चुकूनही उल्लेख करीत नाही त्याचे बीभत्स वर्णन करण्यात काय पुरुषार्थ वाटतो कोण जाणे ? पण पुरुष ही संज्ञा या का- पुरुषांना देऊन त्या शब्दाची बदनामी का करा ? स्त्रिया व देवदेवतां यांचे चारित्र्य हनन करणाऱ्या या दिवाभीताना कोणत्या शब्दाने उल्लेखावे हेच आम्हास कळत नाही अशा टीका भूत कवितेत श्री करंदीकरांनी मोरयावर जशी चिखल फेक केली आहे तशीच स्त्रीजातीची विटंबना करुन आपल्या मेंदूतील कृमि, कीटक, किडे व रोगजंतू यांना निरोगी समाजाच्या स्वच्छ शुध्द व सुरेख वातावरणात आणून सोडले आहे ! गणपति उत्सवाच्या ऐन मोक्याला या कवितेला प्रसिध्दी देऊन सत्यकथेच्या संपादकांनी हा राष्ट्रीय उत्सव साजरा करण्याचा जो अभिनव उपक्रम चालू केला त्याकरिता कोणत्या आरतीने त्यांना ओवाळावे व कोणत्या उपचाराने त्यांची पूजा बांधावी याची आम्हाला चिंता लागून राहिली आहे. पण या विषयाची अधिक चिरफाड करुन आम्ही आमच्या वाचकांना व आमच्या मनाला क्लेश देऊ इच्छित नाही. टीका भूत कविता नव्हे विरुपिका आम्ही खाली उद्धृत करतो. वक्रतुंड महाकाय गणपतीच्या सोंडेकडे पाहून ( अश्लील वाङमय चोरुन वाचणाऱ्या)

एका प्रमदेला
कामेच्छा झाली.
तिचे दोन्ही मोदक स्तन चट्टदिशी घट्ट धरुन
वक्रतुंड महाकाय गणपतीने

 तिला एकवीस वेळा आकाशात गरगर फिरविली आणि जेहेत्तेकालाचे ठायी अश्लील नामक घोर नरकामध्ये फेकून दिली.

 गणाधीशा ही कविता अद्धृत केली म्हणून आम्हांला क्षमा कर व तुझ्या त्या मार्गभ्रष्ट विरोधभक्तांना सदबुद्धि दे ! परंतु इतके करुनही न भागले तर आपल्या सोंडेने या विकारी, विवेकशून्य व विक्षिप्त कविंची मानगूट धरुन त्यांना त्यांच्या नवकाव्य नरकांत भिरकावून दे !

सा. दक्षिण महाराष्ट्र
दि. १७/९/१९७३
*****
(५३)