पान:पुत्र सांगे.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपण या क्षेत्रात मागे नाही हे दाखविण्याकरिता नवकवीना वाकुल्या दाखवीत, त्यांच्याहून अधिक प्रेरणाशून्य, बेचव, ओंगळ, अर्थहीन, अनीतीकारक व वांझोटे मुक्तछंद काव्य ते निरलसपणे व निर्लज्जपणे खरडत असतात. नवकाव्याचे या जातीचे पिशाच्च श्री. विंदा करंदीकर यांच्या अंगी वारंवार संचरत असते, त्या उन्मादी अवस्थेत ते ज्या काव्याला जन्म देतात त्याने बहुजन समाजाच्या धार्मिक निष्ठांना, श्रध्दांना व समजुतींना ते किती निर्दय धक्के देतात याची कल्पना या संचार अवस्थेत त्यांना होणे शक्य नाही. दुर्दैवाने हिंदुसमाज दिवसे दिवस अधार्मिक होत चालला आहे. त्यांच्या देवदेवतांची कोणी कितीही चेष्टा करो, त्यांना त्याची खंत वा खेद वाटत नाही. चीड येण्याचा गुणधर्म तर त्या समाजातून नाहीसा होत आहे. अशा या निधर्मी समाजातच नव- कवीची उत्पत्ती होते म्हणून बरे. या नवकवींनी आपला प्रयोग इतर धर्मियांच्या देवदेवतांवर वा धार्मिक आचारविचारांवर केला तर त्याचे अस्तित्व धोक्यांत आल्यावाचून राहणार नाही. हिंदू समाजांत गणपती देवतेची आराधना करणारे असंख्य लोक आहेत. हिंदूचा प्रत्येक विधी गणरायाच्या स्तवन पूजनेने होत असतो. उत्सव मूर्ति म्हणून त्याची स्थापना करुन भाद्रपद महिन्यांत मोठ्या समारंभाने लोक त्याची उपासना करतात. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला राष्ट्रीय स्वरुप दिले. स्वराज्य पूर्वकाळांत या उत्सवाने राष्ट्रीय भावना उद्दीपीत करण्यांत मोलाची कामगिरी बजावली आहे. अशा या देवतेचे विडंबन करण्याचें श्री. करंदीकर यांना कांही कारण नव्हते. त्यांच्या काव्याला इतर किती तरी विषय आहेत. पण मंगलांत अमंगलाचे दर्शन घेण्याची खोड जडलेल्या या भ्रांत कवीने आपल्या हृदयांत दडून राहिलेली सर्व घाण या देवतेवर फेकून आपल्या अपरिष्कृत व असंस्कारित मनाचे नागडे उघडे प्रदर्शन केले आहे. देव देवतांप्रमाणे स्त्री व तिचे विविध अवयव यांचे किळसवाणे जुगुप्सायुक्त वर्णन करण्याची दुष्ट खोड या समाजकंटक कवीना लागली आहे. वास्तविक पहाता या कवितांच्या जन्मकाळी राष्ट्रीय चळवळीला तेजस्वी आगळे स्वरुप प्राप्त झाले होते. स्वातंत्र्य संपादनाच्या कार्यात कितीतरी वीरांनी आपल्या प्राणांची कुरवंडी केली होती. नंतरच्या काळात कितीतरी काव्यमय प्रसंग उद्भवले पण तशा प्रकारच्या विषयावर हे नराधम कविता करु शकत नाहीत. स्त्रियांना देवता मानून त्यांची पूजा करण्याची केवढी थोर भारतीय संस्कृति व परंपरा आहे. पण भारतात जन्म घेतलेल्या या करंट्या कारट्यांना ज्या

(५२)