पान:पुत्र सांगे.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्याकरणांच्या नियमांचा खून करुन काव्यरचना, कधी कधी शब्दांच्याठायी विरामचिन्हांचा अद्भुत उपयोग असा या कवितांचा विचित्र थाट व विलक्षण घाट असतो. या काव्यात सत्य, शिव आणि सुंदर यांचा आढळ अत्यल्प प्रमाणांतही दिसून येणार नाही, अशी या काव्यकर्त्यांची प्रतिज्ञा असते. जागृत मन व सुप्त मन यामधील आंदोलने, जाणीव व नेणीव यामधील व्यापार, मूर्त व अमूर्त भावांची वाकडी वाटचाल, संज्ञाप्रवाह व विचारधारा यांची कसरत, विकृत विकारांची प्राकृत वर्णने यांनी हे काव्य रसरसलेले असते. बरे या काव्याचा अर्थ त्यांच्या जन्मदात्यांना विचारा, ते बेडरपणे सांगतील की, काव्य प्रसवणे, हे आमचे प्रयोजन. अर्थाची ओढाताण करणं अरसिकाचे कार्य. देहांत भिनते, हृदयांत तरंगते, मनांत संचरते, जिभेत घोळते, ओठांत चिवचिवते पण जे शब्दांत अडकत नाही, आशयात गवसत नाही, अलंकारात रुतत नाही, सरळ म्हणता येत नाही. एवंगुणविशिष्ट जे विकार वासनांचे विरेचन त्यास काव्य अशी हे नवकवि संज्ञा देतात. सामान्य लोकांना हे काव्य कळत नाही. कारण ते निर्बुध्द असतात. या प्रकारच्या काव्याचे बुद्धिशी निकटचे नाते आहे. असे ते उच्चरवाने घोषित करत असतात !! या त्याच्या घोषणेमुळे स्वत:ला विद्यालंकृत पदवं पुष्ट प्राध्यापक म्हणविणाऱ्या कांही पंडित मंडळींची कुचंबणा होऊ लागली. या नवकाव्यात कांही काव्यगुण नाहीत असा अभिप्राय द्यावा तर हे कवि आपणास बुध्दिमांद्य झाले आहे. नवकाव्याची शक्ति कशात आहे हे आकलन होण्याइतपत त्यांच्या बुध्दीची क्षमता नाही असा डांगोरा पिटणार. त्यामुळे आपल्या व्यवसायाला कमीपणा येणार या काल्पनिक धास्तीमुळे त्यांनी नवकाव्यांची वारेमाप स्तुति करण्यास प्रारंभ केला. नवकाव्यावरील या विद्वानांची भाष्ये व टीका वाचल्या म्हणजे सरस्वती सदनात वावरण्याचा या पुजाऱ्यांना काय अधिकार आहे असा जाब त्यांना विचारावा असे वाटते. परस्परांची प्रशंसा करीत हे नवकवी आणि नव टीकाकार मराठी वाङमयात जी पुंडाई करीत आहेत तिचा धिक्कार करण्याचे श्रेष्ठ धारिष्ठ अभ्यासी वाङमयोपालकांनी दाखवू नये ही मोठ्या खेदाची गोष्ट आहे. त्यांच्या या अनास्थेमुळे तरुणांच्या सदभिरुचीला अनिष्ट वळण लागत आहे व उच्च प्रतीचे साहित्य निर्मितीची वाटचाल करीत नाही. त्यातल्यात्यात भाग्याची गोष्ट एवढीच की हे साहित्य शेतकरी, मजूर व सामान्य लोक यांच्या मनाचा ठाव घेत नाही. पण या साहित्याची बाधा नामवंत प्रतिभाशाली कवीनाही होते आणि

(५१)