आपला पिच्छा पुरवला. एक विलक्षण भूत आपल्या मानगुटीला बसले. तो परिणाम, ते अरिष्ट, ती सुलतानशाही, तो रोग, ते भूत म्हणजे आजचे मराठी भाषेतील नवकाव्य व ते ओकणारे नवकवि ! युध्दाच्या आपत्तींतून युरोप- खंडातील देश बाहेर पडले. त्यांना नव-जीवन प्राप्त झाले. तेथील लोक नव्या उत्साहाने नवे उपक्रम होती घेऊ लागले. पण तेथील युध्दोत्तर काळातील भारतात आयात झालेले काव्य वाचून आमचे परभृत कवि जणु युध्दाचा तडाखा आपल्यालाच बसला असा कृत्रिम आव आणून जे भयंकर ओंगळ काव्य प्रसवू लागले, त्याला काव्य म्हणणे म्हणजे काव्य या शब्दाची क्रूर चेष्टा करणे होय. मंगलात अमंगल पहाण्याची, शुभात अशुभाचे दर्शन घडविण्याची, सौंदर्यात कुरुपतेचा आविष्कार वठविण्याची, सुगंधात दुर्गंधीची धमाल उडवून देण्याची जी एक अपूर्व दिव्य दृष्टि सैतानाच्या कृपेने नव - कवि ही बिरुदावली धारण करणाऱ्या या नतद्रष्ट-नराधमांना प्राप्त झाली आहे, ती दृष्टी पाहिली की ब्रम्हदेवालासुध्दा ही अवलाद निर्माण करण्याचे पातक आपले हातून घडले याचे वाईट वाटत असेल. दुर्देवाने या संसर्गजन्य दृष्टिची लागण अनेक कवींना होऊ लागली आहे. त्यांचे अमाप पीक काँग्रेसी गवताप्रमाणे उदंड येऊ लागले आहे. युध्दाची आपत्ती चालेल, काँग्रेसचे राज्य परवडेल, सहकारी संस्थांचा गोंधळ सहन करु, साखरकारखान्यांचा कारभार शिरोधार्य मानू पण हे कवि व त्यांचे ते विनाशी काव्य यांनी आम्ही खरोखर जर्जर झालो आहो. कुटुंबनियोजनापेक्षा या नवकाव्याच्या पैदाशीवर नियंत्रण घातले तर महाराष्ट्रातील तरुणांना त्यांच्या भावी यशाचा मार्ग सुकर करुन देण्याचे श्रेय महाराष्ट्र सरकारला मिळणार आहे. हे काव्यबीज समूळ नष्ट करण्याचा अचूक उपाय कोणी शोधून काढला तर त्याला राष्ट्रपती पदक देऊन त्या व्यक्तीची व त्या पदकाची प्रतिष्ठा वाढवावी.
वरील विचार सुचण्याचे कारण आम्ही 'सत्यकथा' या मासिकाचा मागील महिन्याचा अंक वाचला. नवकाव्याची धुरा वहाण्याचे महत्कार्य हे मासिक सातत्याने करीत असते. एकादा भाबडा वाचक यातील कविता भाविकपणे वाचू लागला तर त्याला मानसोपचार करणाऱ्या 'कृपामाई' चा रहिवासी व्हावे लागेल. वाचकांची संख्या वाढू लागली तर या मतिभ्रष्ट मंदिराच्या शाखा खेडोपाड्यात स्थापणेही भाग पडेल. या मासिकांत प्रसिध्द होणाऱ्या कवितांना अर्थ नसतो. अनर्थाला भरपूर वाव असतो. अर्थविहीन शब्द, आशयविरहित काव्य,